लालचिखल...! टोमॅटोला मिळतोय अत्यल्प बाजारभाव; शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर | पुढारी

लालचिखल...! टोमॅटोला मिळतोय अत्यल्प बाजारभाव; शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर

पारगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : टोमॅटोच्या 20 किलोच्या क्रेटला केवळ 100 ते 150 रुपये दर मिळत आहे. त्यातच दूषित हवामानामुळे विविध कीडरोगांचा प्रादुर्भाव टोमॅटोवर झाला आहे. त्यामुळे टोमॅटोची तोडणी करून बाजारभाव चांगला मिळत नसल्याने टोमॅटो फेकून देण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. टोमॅटोला अत्यल्प बाजारभाव मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त
केली आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात दरवर्षी उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणावर टोमॅटो पीक शेतकरी घेतात.

यंदा मात्र सुरुवातीपासूनच टोमॅटोला बाजारभावाची साथ मिळालीच नाही. टोमॅटो पिकासाठी भांडवल मोठ्या प्रमाणावर गुंतवावे लागते. यंदा उष्णतेचे अधिक प्रमाण असून, अवकाळी पाऊस व ढगाळ हवामानामुळे टोमॅटोवर तिरंगा, पांढरी माशी, करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला. त्यातच बाजारभाव देखील कमी मिळत आहे. 20 किलोच्या क्रेटला केवळ 100 ते 150 रुपये भाव मिळत आहे. या दरातून गुंतविलेले भांडवल तर दूरच, तोडणी मजुरी, वाहतुकीचा खर्च देखील वसूल होत नसल्याचे शेतकरी मंगेश बेनके यांनी सांगितले.

टोमॅटोचे बाजारभाव घसरल्याने टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांनी आता टोमॅटोची तोडणी करून ते क्रेट दुचाकीवर घेऊन टोमॅटोची किरकोळ विक्री सुरू केली आहे. नारायणगाव येथील टोमॅटो बाजारामध्ये क्रेट घेऊन गेल्यास दर कमी मिळतो. परंतु, घरोघरी टोमॅटोची विक्री केल्यास तसेच आठवडा बाजारामधील विक्रेत्यांना टोमॅटो विकल्यास टोमॅटोला दर चांगला मिळत असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. आता अनेक शेतकर्‍यांनी टोमॅटोची किरकोळ विक्री सुरू केली आहे.

Back to top button