

पिंपरी ; पुढारी वृत्तसेवा : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सध्याचा कार्यकाल पूर्ण करेलच; पण विधानसभेच्या पुढील निवडणुकीनंतरही पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेरगाव येथे रविवारी पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक साडेतीन महिन्यांवर येऊन ठेपली असल्याने पक्षाला उभारी देण्यासाठी हा मेळावा आयोजित केला होता. शरद पवार म्हणाले की, पूर्वीच्या सरकारने कामगार व शेतकर्यांच्या हितासाठी केलेले कायदे दिल्लीतील भाजप सरकार बदलून कामगार व शेतकरी विरोधी कायदे निर्माण करीत आहे.
पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरचे दर सतत वाढत आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पिंपरीत सुरू केलेली हिंदुस्थान अॅन्टीबायोटिक्स कंपनी भाजपने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी टीका त्यांनी केली.
केंद्र सरकार ईडी, सीबीआय चौकशा लावत आहे. कितीही ईडी, बिडी आले तरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार पुन्हा पाच वर्षांसाठी सत्तेत येणार आहे, असा पुनरुच्चार शरद पवार यांनी यावेळी केला.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठीच हा मेळावा घेतल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले. वैचारिक लढाईसाठी मैदानात उतरलेल्या 80 वर्षांच्या तरुणाचे विचार ऐकण्यासाठी कार्यकर्ते जमल्याचे खा. डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.