वाल्हे : गायकवाडवाडीला शासकीय टँकरची अद्याप प्रतीक्षाच | पुढारी

वाल्हे : गायकवाडवाडीला शासकीय टँकरची अद्याप प्रतीक्षाच

वाल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : वाल्हे (ता. पुरंदर) नजीक गायकवाडवाडी परिसरातील जलस्रोतांची पातळी खालावल्याने ग्रामस्थांनी त्वरित टँकर सुरू करण्याची मागणी केली होती. याबाबतचे वृत्त दै. ’पुढारी’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने तत्काळ पिण्याच्या पाण्यासाठी एका टँकर सुरू करण्यात आला. परंतु, या भागात अद्यापही शासकीय टँकर सुरू करण्यात आलेला नाही.
श्री

मंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टची सेवा 31 मेपर्यंतच सुरू राहणार आहे. त्यानंतर शासकीय टँकर सुरू न झाल्यास, येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी पुन्हा भटकावे लागणार आहे, यामुळे या भागात शासकीय टँकर सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वाल्हे गावच्या पूर्वेकडील गायकवाडवाडी, भैरजीचीवाडी, झापाचीवाडी आदी वाड्या-वस्त्यांवर मागील काही दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तसेच अंबाजीचीवाडी, मुकदमवाडी, बाळाजीवाडी, मोरूजीचीवाडी, पवारवाडी, वडाचीवाडीत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

पुरंदर तालुक्यातील राख, नावळी, गायकवाडवाडी, पूर-पोखर, रिसे, चतुरमुख महादेव मंदिर वारवडी, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतळ वाल्हे आदी ठिकाणी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने दोन टँकर सुरू केले आहेत. टँकर सेवा 31 मेपर्यंत सुरू राहणार आहे. यानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी दोन्ही टँकरची देखभाल-दुरुस्ती केली जाणार आहे. पालखी सोहळ्यातील वैष्णवांच्या सेवेत टँकर रुजू होणार आहेत. शासनाने लवकरात-लवकर या भागात शासकीय टँकर सुरू करावा.

           महेश सूर्यवंशी, कोषाध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर ट्रस्ट.

Back to top button