निमगाव म्हाळुंगीतून पाच किलो गांजा जप्त | पुढारी

निमगाव म्हाळुंगीतून पाच किलो गांजा जप्त

तळेगाव ढमढेरे; पुढारी वृत्तसेवा : निमगाव म्हाळुंगी येथील न्हावरा रस्त्याच्या कडेला गांजा घेऊन आलेल्या कारवर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत पाच किलो गांजासह कार जप्त करत रमेश लक्ष्मण पिंगळे व राहुल दौंडकर या दोघांवर गुन्हे दाखल केले; मात्र राहुल दौंडकर हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील न्हावरा रस्त्याचे कडेला दोन युवक गांजा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिस कर्मचारी भास्कर बुधवंत यांना मिळाली.

त्यांनतर पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वैभव पवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलिस हवालदार अमोल दांडगे, शिवाजी चितारे, किशोर तेलंग, पोलिस जवान निखिल रावडे, भास्कर बुधवंत, किशोर शिवणकर यांनी तेथे सापळा रचला. या वेळी त्यांना संशयित काळ्या रंगाची व काळ्या काचा असलेली कार (एमएच 12 केटी 8008) आलेली दिसली.

पोलिसांची चाहूल लागताच कारमधील एक युवक पळून गेला, तर पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेत कारची झडती घेतली. त्यामध्ये पोलिसांना पांढर्‍या रंगाच्या पिशव्यांमध्ये गांजा असल्याचे दिसून आले. या वेळी पोलिसांनी तब्बल पाच किलो गांजासह कार जप्त केली. याबाबत पोलिस कर्मचारी भास्कर महादेव बुधवंत (रा. शिक्रापूर, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार पोलिसांनी रमेश लक्ष्मण पिंगळे (वय 22, रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर) व राहुल दौंडकर (रा. चिंचोशी, ता. खेड) या दोघांवर गुन्हे दाखल करत रमेश लक्ष्मण पिंगळे याला अटक केली आहे. पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रणजित पठारे हे या घटनेचा तपास करत आहेत.

काळ्या काचांच्या वाहनांवर कारवाई करणार

काळ्या काचांच्या वाहनातून अनेक गुन्हे घडत आहेत. गांजा, दारूची बेकायदेशीरपणे वाहतूक केली जाते; मात्र काळ्या काचांमुळे अडथळे निर्माण होत असल्याने लवकरच आपण परिसरातील काळ्या काचांच्या वाहनांवर कारवाई करणार असल्याच पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी सांगितले.

Back to top button