भवानीनगर : साखर कारखान्यांना 176 कोटींचा दंड हा केवळ फार्स

भवानीनगर : साखर कारखान्यांना 176 कोटींचा दंड हा केवळ फार्स

भवानीनगर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : 'राज्यातील 22 साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी केलेला 176 कोटी रुपयांचा दंड हा केवळ फार्स आहे. भाजपचे एक शिष्टमंडळ केंद्रात किंवा राज्यात जाईल व शेतकर्‍यांवर मोठे उपकार म्हणून 176 कोटी रुपये आम्ही माफ केले, असे जाहीर करेल. हे म्हणजे शेजार्‍याच्या लग्नात जसा सुनेला जेवण्याचा आग्रह असतो तसा हा प्रकार आहे,' असा टोला शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष पांडुरंग रायते यांनी लगावला.

मंत्री समितीने जाहीर केलेल्या तारखेपूर्वी गाळप हंगाम सुरू केला म्हणून राज्यातील 22 साखर कारखान्यांना 176 कोटी रुपयांचा दंड साखर आयुक्तांनी केला आहे. साखर आयुक्तांनी साखर कारखान्यांना केलेला दंड म्हणजे ऊस उत्पादक शेतकर्‍यांना केलेला दंड आहे. या साखर कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी गाळपासाठी ऊस घातला, त्याच शेतकर्‍यांना या दंडाचा भुर्दंड बसणार आहे. शेतकर्‍यांच्या उसाला अगोदरच कमी भाव मिळत आहे. त्यातूनच या दंडाची रक्कम आमच्या शेतकर्‍यांच्या ऊस बिलातून कापली जाणार आहे.

मंत्री समितीने सुरुवातीला साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू करण्याची 1 ऑक्टोबर 2022 ही तारीख जाहीर केली होती. त्याप्रमाणे साखर कारखान्यांनी ऊसतोडणी यंत्रणा कारखान्यावर आणली व नंतर मंत्री समितीने गाळप हंगाम सुरू करण्याच्या तारखेमध्ये बदल केला. साखर कारखान्यांनी आणलेल्या ऊसतोड मजुरांना बसवून ठेवले, तर त्यांना बसपाळी कोण देणार होते? त्यामुळे ऊसतोड यंत्रणेला बसवून ठेवायचे कसे? असा प्रश्न साखर कारखान्यांसमोर उभा राहिला. परिणामी, या साखर कारखान्यांनी मंत्री समितीने जाहीर केलेल्या तारखेपूर्वी गाळप हंगाम सुरू केला, असे रायते म्हणाले.

साखर आयुक्तांनी साखर कारखान्यांनी एफआरपी दिली आहे का? प्रत्येक कारखान्याची शुगर कन्व्हर्शन कॉस्ट किती आहे? उत्पादन खर्चात कारखान्यांनी कुठे वाढ केली आहे? मोलॅसेसचे उत्पादन कोणत्या कारखान्याने जास्त घेतले आहे? मोलॅसेस कोणत्या कारखान्याने किती दराने विकले आहे? कामगारांचे पगार वेळेवर होतात का? कारखाने साखर उतारा चोरतात का? ऊसतोड करणार्‍या मजुरांना कारखाने सेवा देतात का? किती ऊस वाहतूकदारांच्या मुकादमांनी वाहतूकदारांची फसवणूक केली आहे?

ऊसतोडणी करणार्‍या किती टोळ्या पळून गेल्या आणि त्यांच्या वसुलीसाठी व ऊसतोडणीसाठी भविष्यातील धोरण कसे असावे? चांगल्या साखर उतार्‍याचा ऊस कोणता आहे आणि त्याची लागवड वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे असे शेतकर्‍यांचे हिताचे निर्णय घेण्याचे काम साखर आयुक्तांनी केले पाहिजे; परंतु शेतकरीविरोधी वागण्याचे यांचे रोजचेच काम सुरू आहे. असे म्हणजे दोन हत्तींच्या वादात शेतकर्‍याला मारू नका, असे आवाहन रायते यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news