पुण्यातील भोसले क्रीडांगण झाले मद्यपींचा अड्डा! | पुढारी

पुण्यातील भोसले क्रीडांगण झाले मद्यपींचा अड्डा!

हडपसर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : हडपसर येथील अमर कॉटेज परिसरातील भोसले क्रीडांगण सध्या मद्यपींचा अड्डा झाला असून, या ठिकाणी तळीरामांचा वावर वाढला आहे. स्वच्छतागृहात पाणी नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. याबाबत अनेकवेळा तक्रार करूनही महापालिका प्रशासन या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे या भागातील सोसायट्यांतील रहिवाशांनी सांगितले.

या क्रीडांगणाची साफसफाई करावी तसेच त्याला संरक्षक भिंत बांधून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या मैदानात रात्रंदिवस मद्यपींचा वावर वाढला आहे. मद्याच्या बाटल्या परिसरात पडल्याचे दिसून येत आहे. तसेच अमली पदार्थांचे सेवन करणार्‍यांची देखील या ठिकाणी वर्दळ आहे. मैदानातील स्वच्छतागृहामध्ये पाणी नसल्यामुळे दुर्गंधी सुटली आहे. यामुळे आजूबाजूच्या सोसायटीमधील नागरिक त्रस्त झाले आहेत.

मैदानावरील भिंत व गेट तुटले आहे. मैदानासाठी सुरक्षारक्षक असूनही त्याचा काहीही उपयोग होत नाही. मैदानाच्या भिंतीवरून उड्या मारून मद्यपी आत येत आहेत. ओपन जीमचे साहित्य चोरीला गेले आहे. काही तुटलेले आहे. महापालिका प्रशासनाने या मैदानाकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या क्रीडांगणाची दुरवस्था झाली आहे. हा परिसर मद्यपींचा अड्डा झाला आहे. मॉर्निंग वॉक करण्यासाठी येणार्‍या नागरिकांना या ठिकाणी विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

                                                – मयूर शिंदे, रहिवासी

हडपसर परिसरातील क्रीडांगणे व उद्यानांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे विविध समस्या निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

                                           – दीपक अमृतकर, रहिवासी

Back to top button