पुण्यातील घोरपडी पोलिस चौकीत महिलेचा गोंधळ; पोलिसांना धमकावले | पुढारी

पुण्यातील घोरपडी पोलिस चौकीत महिलेचा गोंधळ; पोलिसांना धमकावले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : घोरपडी येथील पोलिस चौकीत जमाव जमवून पुरुष कर्मचारी असल्याचा गैरफायदा घेत महिलेने स्वत:ची साडी फेडून अश्लील शिवीगाळ केली. तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे. कार्तिक नायकर (वय 32), जय दिलीप सरदार (वय 23, रा. भारत फोर्ज रोड, घोरपडी) यांच्यासह चार महिलांना अटक करण्यात आली. याबाबत पोलिस हवालदार तुळशीराम रासकर यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार गुरुवारी दुपारी दीड वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी महिलेच्या मुलीने प्रेमविवाह केला आहे. त्याचा राग मनात धरून कार्तिक नायकर याने शिवीगाळ करून धमकी दिली होती, त्यामुळे कार्तिक याच्याविरुद्ध 149 नुसार नोटीस बजावित होते, तेव्हा आरोपींनी घोरपडी पोलिस चौकीत जमाव जमवत प्रेमविवाह केल्याच्या रागातून चौकीत फक्त पुरुष अधिकारी व अंमलदार हजर असल्याचा गैरफायदा घेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

त्यांना तेथून शांततेत निघून जा, असे पोलिस अधिकार्‍यांनी समजावले असताना यातील एका महिलेने स्वत:च्या अंगावरील साडी स्वत: फेडून तक्रारदार व सहायक निरीक्षक सुतार व इतर अंमलदार यांचे अंगावर मारण्याकरिता धावून जाऊन अश्लील शिवीगाळ करून विनयभंगाचा गुन्हा दाखल करते, अशी धमकी दिली. तर, इतर संशयित शिवीगाळ करून मारण्याकरिता अंगावर धावून गेल्याबाबत फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Back to top button