‘सीबीएसई’च्या दहावी-बारावी निकालाचा टक्का घटला ! | पुढारी

'सीबीएसई'च्या दहावी-बारावी निकालाचा टक्का घटला !

पुणे; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावी-बारावी परीक्षांचा निकाल शुक्रवारी (दि. 13) जाहीर करण्यात आला. यामध्ये बारावीच्या परीक्षेत 87.33 टक्के, तर दहावीच्या परीक्षेत 93.12 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या निकालात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.38 टक्क्यांनी, तर दहावीच्या निकालात 1.28 टक्क्यांनी घट झाली. त्यामुळे यंदा दहावी-बारावी निकालाचा टक्का घटला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘सीबीएसई’ने नेहमीप्रमाणे यंदाही कोणतीही पूर्वसूचना न देता शुक्रवारी सकाळी बारावीचा आणि दुपारी दहावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला. देशभरातील 28 हजार 471 शाळांमधील, तर परदेशातील 26 देशांच्या शाळांमधील 38 लाख 82 हजार 834 विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षेला नोंदणी केली होती. दहावीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान घेण्यात आली. देशभरातील 24 हजार 480 शाळांमधील 21 लाख 84 हजार 117 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

त्यातील 21 लाख 65 हजार 805 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 20 लाख 16 हजार 779 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थिनींचा निकाल 1.98 टक्क्यांनी अधिक आहे. बारावीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिल या कालावधीत घेण्यात आली. देशभरातील 16 हजार 728 शाळांमधील 16 लाख 80 हजार 256 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील 16 लाख 60 हजार 511 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, त्यातील 14 लाख 50 हजार 174 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थिनींचा निकाल 6.01 टक्क्यांनी अधिक आहे.

पुणे विभागाचा निकाल..

‘सीबीएसई’च्या पुणे विभागात महाराष्ट्र, गोवा, दीव-दमण, दादरा आणि नगर हवेली समाविष्ट आहे. त्यानुसार पुणे विभागातील दहावीची परीक्षा दिलेले 96.92 टक्के विद्यार्थी, तर बारावीचे 87.28 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

पुढील वर्षी परीक्षा 15 फेब्रुवारीपासून

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने 2024 मध्ये घेण्यात येणार्‍या परीक्षेची तारीखही जाहीर केली आहे. त्यानुसार दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा 15 फेब्रुवारी या एकाच दिवशी सुरू होणार असल्याची माहिती ’सीबीएसई’तर्फे देण्यात आली आहे.

 

Back to top button