पिंपरी : किवळे येथे जाहिरात होर्डिंग कोसळून 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांच्या वारसांना राज्य शासनाने मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 3 लाखांची मदत जाहीर केली होती. ती एकूण 15 लाखांची रक्कम पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत ती रक्कम कायदेशीवर वारसदारांची पडताळणी करून त्यांना दिली जाणार आहे.
होर्डिंग कोसळण्याची दुर्दैवी घटना 17 एप्रिलला सायंकाळच्या सुमारास घडली. होर्डिंगच्या लोखंडी सांगाड्याखाली चिरडून 4 महिला व 1 पुरुष जागीच ठार झाले. तर, 3 जण गंभीर जखमी झाले. दोन जखमींना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
तर, एका जखमीवर थेरगावच्या बिर्ला रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचाराचा सर्व खर्च महापालिका करीत आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 3 लाखांची मदत घटनेच्या दुसर्या दिवशी जाहीर केली होती. ती एकूण 15 लाखांची रक्कम पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बँक खात्यात 21 एप्रिलला जमा करण्यात आली आहे. मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसास आवश्यक ती संपूर्ण पडताळणी करून आर्थिक मदतीचे वाटप करावे. मृत व्यक्तीचे पोलिस पंचनामा, मृत्यू प्रमाणपत्र, पोस्ट मार्टम रिपोर्ट, आदी कागदपत्रे कार्यालयाकडे पाठवावेत, असे आदेश मुख्यमंत्री कार्यालयाने दिले आहेत. त्यानुसार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कार्यवाही सुरू केली. मृतांच्या वारसांना ती रक्कम पिंपरी-चिंचवडच्या अपर तहसीलदार यांच्या मार्फत दिला जाणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत ही रक्कम वारसदारांना दिली जाईल, असे अधिकार्यांनी सांगितले.