तळेगाव दाभाडे : पुढारी वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नवनियुक्त मुख्याधिकारी एन. के, पाटील यांनी पाणीपुरवठा विभाग व आरोग्य विभागाचा पाहणी दौरा (दि.9 मे) रोजी करून चालू असलेल्या कामकाजाबाबत माहिती घेऊन अधिकार्यांना योग्य सूचना केल्या. येथील पाणीपुरवठा विभागाच्या अधिन असलेल्या सोमाटणे पंप हाऊस, इंद्रायणी पंपहाऊस, चौराई जलशुद्धीकरण केंद्र, इंद्रायणी जलशुद्धीकरण केंद्र येथे पाहणी केली. या वेळी शहर अभियंता मल्लिकार्जुन बनसोडे, कार्यालयीन अधीक्षक, रवींद्र काळोखे, पाणीपुरवठा अभियंता स्मिता गाडे, अभियंता प्रवीण वारिंगे, प्रवीण यादव, ठेकेदार विजय राक्षे इत्यादी उपस्थित होते.
या वेळी पूर्व पावसाळी पाणीपुरवठा करण्याचे नियोजन तसेच विद्युत पुरवठा खंडित झाल्यास अतिरिक्त व्यवस्था करणे, सोमाटणे पंपहाऊस येथील 90 एचपी पंपसाठी विद्युत प्रवाह चालू करून वर्किंगमध्ये आणणे, पवना जलपात्रातील शेवाळ व गाळ काढणे, 250एम एम 300 एमएमची जीर्ण झालेली लाईन बदलणे, रसायन द्रवण टाकी दुरुस्त करणे, राडारोडा काढणे, साठवण टाकीचे संरचनात्मक परीक्षण करणे, यशवंतनगर जलशुद्धीकरण येथे चेनपुली करणे आदी सूचना अधिकार्यांना करण्यात आल्या.
तसेच नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प केंद्रावर प्रत्यक्ष भेट देऊन स्थळ पाहणी केली. सदर स्थळ पाहणीदरम्यान कार्यालयीन अधीक्षक रवींद्र काळोखे, समन्वय गीतांजली होनमाने, स्वच्छता निरीक्षक प्रमोद फुले, पर्यवेक्षक ओमकार माने, संबंधित ठेकेदार उपस्थित होते. स्थळ पाहणीदरम्यान शहरातील दररोज निर्माण होणारा ओला व सुका कचरा त्यावरील होणारी प्रक्रियेबाबत व मुख्याधिकारी यांनी बारकाईने पाहणी केली.