पिंपरी : ट्रान्सफॉर्मर बिघाडामुळे सांगवी रात्रभर अंधारात | पुढारी

पिंपरी : ट्रान्सफॉर्मर बिघाडामुळे सांगवी रात्रभर अंधारात

नवी सांगवी (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा :  सांगवी व पिंपळे गुरव परिसरात पावसाळ्यापूर्वी विजेची कामे महावितरणकडून करण्यात आली. त्यासाठी टप्प्याटप्प्यात वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता. पावसाळ्यामध्ये येणार्‍या आपत्तीला सामोरे जात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्षात पावसाळा येण्यापूर्वीच महावितरणच्या नियोजनाचा बोजवारा उडत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. नवी सांगवी परिसरात तब्बल 12 तासाहून अधिक वेळ वीज गायब झाल्याने व्यावसायिक, गृहिणी तसेच दुकानदारांना मोठा त्रास सहन करावा लागला.

उन्हाळ्याची दाहकता त्यातच महावितरणचा हलगर्जीपणा त्यामुळे स्मार्ट सिटीतील नवी सांगवी परिसरात संपूर्ण रात्र नागरिकांना उकाड्याने व मच्छरांच्या उपद्रवाने जागून काढावी लागली. बुधवारी रात्री महावितरणच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांच्यातच ताळमेळ नसल्याचे दिसून आले. दहा मिनिटांत लाईट येईल, एक तासात लाईट येईल असे सुरुवातीला सांगण्यात आले. मात्र गुरुवारी पहाटे तीन वाजेपर्यंत ही लाईट आली नसता विचारणा केल्यावर येथील परिसरातील ट्रान्सफॉर्मर जळाला असून आपल्याकडे पर्यायी ट्रान्सफॉर्मर उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली. जोरदार पावसाचे आगमन झाल्यास वीजपुरवठा सुरळीत राहणार का? याबाबत नागरिकांकडून विचारणा होत आहे.

नागरिकांच्या गैरसोयीचे काय, असाही प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. नवी सांगवी परिसरात समर्थ नगर, आदर्श नगर, फेमस चौक या भागामध्ये बुधवार रात्री पासून वीज खंडित झाली. त्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले होते. नागरिकांना स्वच्छतागृहासाठी, पिण्यासाठी लाईट नसल्याकारणाने पाणी उपलब्ध नाही, त्यात कडक उन्हाळा असल्या कारणाने गर्मीने प्रचंड हाल होत होते. आख्खी रात्र जागून काढली तरी वीज येत नव्हती. त्यामुळे येथील नागरिकांनी महावितरणच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.

नवी सांगवी येथील फेमस चौकातील नंदराज संकुल याठिकाणी बुधवारी रात्री ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. या वेळी युद्धपातळीवर कामकाज सुरू केले. कालांतराने ट्रान्सफॉर्मर जळाल्याचे समजले. पहाटे तीन वाजता नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध होणे शक्य नव्हते. सकाळी जेसीबी, टेम्पो उपलब्ध करून नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध केला. ते जोडण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. अर्ध्या पाऊण तासात वीजपुरवठा सुरळीत होईल. याबाबत वरिष्ठांना वेळोवेळी माहिती दिली जात असते.
                                  -रत्नदीप काळे, सहाय्यक अभियंता,महावितरण

उकाड्यामुळे जीव आधीच कासावीस होत आहे. त्यातच रात्रभर वीज गायब झाल्यामुळे झोपही पूर्ण झाली नाही. शरीराची अक्षरशः लाही लाही झाली होती. अचानक रात्री वीज गेल्याने मोबाईल टॉर्च बंद पडले. मेणबत्त्या कुठून आणणार, अशी गत निर्माण झाली होती. अशी वेळ पुन्हा येऊ नये.
                                         – स्वप्नील जाधव, स्थानिक रहिवासी

Back to top button