शिरदाळेकरांसाठी तलाव ठरतोय वरदान; उन्हाळ्यातही 30 टक्के पाणीसाठा शिल्लक | पुढारी

शिरदाळेकरांसाठी तलाव ठरतोय वरदान; उन्हाळ्यातही 30 टक्के पाणीसाठा शिल्लक

लोणी-धामणी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : कायम दुष्काळाच्या झळा या गावाला सोसाव्या लागतात. त्यात प्रत्येक कुटुंबातील एकतरी व्यक्ती पुणे, मुंबई, भोसरी येथे नोकरीला असल्याने किंवा काहींचे उद्योगधंदे असल्याने येथील कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. पिण्याच्या पाण्याचा जेव्हा प्रश्न येतो, तेव्हा या गावाच्या मदतीला हे ग्रामतळे येते. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पुढाकाराने भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून 2002-03 ला झालेले खोलीकरण पाणीसाठ्यात वाढ होण्यास कारणीभूत ठरले आहे.

त्या वेळी 12 ते 15 लक्ष रुपये खर्च करून तळ्यातील गाळ काढून शेतकर्‍यांनी शेतात नेऊन टाकला होता. खोलीकरणाने पाणीसाठ्यात वाढ झाली असून, तो उन्हाळ्यातही पुरतो. यंदाही उन्हाळा संपत आला तरी तलावात 30 टक्के पाणीसाठा टिकून आहे. तळ्याच्या बाजूला असणार्‍या विहिरीतून प्रत्येकाच्या घरी पाणी मिळते.

शेतीच्या पाण्याच्याबाबतीत आम्ही कमनशिबी असलो तरी पिण्याच्या पाण्याच्याबाबतीत भाग्यवान आहोत. तलावातील सार्वजनिक विहिरीवरून पाणी फिल्टर करून प्रत्येकाला शुद्ध पाणी ग्रामपंचायत पुरवते. ग्रामपंचायतचा कर भरणार्‍या व्यक्तीला पाणी मोफत देण्याचा उपक्रम आम्ही चालू केला आहे. त्यालाही ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद आहे.

                                                        मयूर सरडे, उपसरपंच, शिरदाळे.

Back to top button