पुण्यासह या तीन जिल्ह्यांसाठी वरदायिनी ठरणाऱ्या उजनी धरणातील पाणी शाप की वरदान? | पुढारी

पुण्यासह या तीन जिल्ह्यांसाठी वरदायिनी ठरणाऱ्या उजनी धरणातील पाणी शाप की वरदान?

पळसदेव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सोलापूर, पुणे आणि नगर जिल्ह्यांसाठी वरदायिनी उजनी धरणातील वाढते पाणी प्रदूषण ही गंभीर समस्या बनली आहे. आज मानवासह पशू-पक्षी, प्राणी व सर्वच जलचर, उभयचर प्राणी या प्रदूषणाच्या विळख्यात अडकले आहेत. अनेक माशांच्या जाती नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे धरणातील पाणी शाप की वरदान? असे म्हणण्याची वेळ आली आहे.

राज्यातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे आगार म्हणून उजनी धरणाकडे पाहिले जाते. बदलत्या धोरणानुसार राजकारण्यांनी विकासाच्या नावाखाली गेल्या 30-40 वर्षांच्या काळात धरणालगतच्या परिसरात अनेक साखर कारखाने, केमिकलयुक्त कंपन्या, छोटे-मोठे कारखाने उजनी धरणातील पाण्याच्या आधारावर आणून सुरू केले आहेत. या कारखान्यांनी उजनीतून स्वच्छ पाणी उचलले व धरणात घाण व केमिकलयुक्त पाणी सोडले. तसेच पुणे, पिंपरी चिंचवड, कुरकुंभ एमआयडीसी आदी ठिकाणच्या नागरिकांनी सोडलेला मैला व सांडपाणी धरणात येऊन पडत आहे. परिणामी, उजनीचे स्वच्छ पाणी आता मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे.

लाखो लोकांकडून प्रदूषित पाण्याचा वापर

उजनी प्रदूषित झाल्याची माहिती असतानाही सोलापूर जिल्हा हेच पाणी पीत आहे. दरवर्षी आषाढी वारीला राज्यातून जाणारे लाखो वारकरीही ह्याच पाण्यात स्नानादिक कामे करतात. बहुतांश नागरिक विविध आजारांनी त्रस्त आहेत. पावसाळ्यात उजनीत येणारे पाणी प्रदूषित, फेसाळलेले असते. धरण भरल्यावर दिवाळीनंतर पाण्यावर गडद पोपटी रंग दिसतो. पाण्याला अतिशय दुर्गंधी असते. उजनीतील पाण्याला पुन्हा स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे; परंतु प्रशासकीय अधिकारी विविध कंपन्या व साखरसम्राटांची हुजरेगिरी करण्यात मग्न आहेत.

Back to top button