कुठे मुलांची गर्दी, तर कुठे शांतता ! पुण्यातील इंद्रप्रस्थ उद्यानांतील चित्र | पुढारी

कुठे मुलांची गर्दी, तर कुठे शांतता ! पुण्यातील इंद्रप्रस्थ उद्यानांतील चित्र

येरवडा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : येरवडा येथील अग्निशमन केंद्राच्या बाजूला असलेल्या इंद्रप्रस्थ उद्यानाचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे. चिमा उद्यानदेखील मेट्रोमुळे लहान झाले आहे. तर हुतात्मा स्मारक उद्यानाबाहेर अतिक्रमणे वाढली आहेत. पाम गार्डन आणि लुंबिनी उद्यान ही नीटनेटकी असल्यामुळे आबालवृद्धांची या ठिकाणी गर्दी होत आहे.

शाळांना सध्या उन्हाळ्याच्या सुट्या असल्यामुळे परिसरातील विविध उद्यानांमध्ये खेळण्यासाठी लहान मुलांची गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, इंद्रप्रस्थ उद्यान रिकामे असून, या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी साहित्य शिल्लक नाही. हे उद्यान बॉश कंपनीला बीओटी तत्वावर दिले आहे. कंपनी या जागेवर पार्किंगचे थीम पार्क उभारण्यात येणार आहे. कंपनीने या जागेवर थीम पार्क लवकर उभारण्याची मागणी होत आहे.

आळंदी रस्त्यावरील आरटीओ कार्यालयासमोरील हुतात्मा स्मारक उद्यानाबाहेर स्टॉलधारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या ठिकाणी झालेल्या अतिक्रमणांवर कारवाई होणे आवश्यक आहे. एक वर्षापूर्वी सुरू झालेले स्वर्गीय माजी महापौर भारत सावंत पाम उद्यान आठ एकरांत असून या ठिकाणी सकाळ, संध्याकाळी नागरिक व मुलांची गर्दी होते.

खेळणी, वॉकिंग ट्रक आणि कारंज्यांमुळे मुले या ठिकाणी रमत आहेत. महाराष्ट्र हौसिंग बोर्डमधील लुंबिनी उद्यानात भगवान गौतम बुद्ध यांची वेगवेगळी शिल्पे साकारली आहेत. शिवसेनेचे शशी साटोटे म्हणाले की, येरवड्यातील लोकांना आता जवळचे असे चांगले उद्यान शिल्लक राहिले नाही. इंद्रप्रस्थ उद्यान हे विकसित करणे आवश्यक आहे.

येरवड्यातील इंद्रप्रस्थ उद्यान ट्रॅफिक थीम पार्क उभारण्यासाठी बॉश कंपनीला देण्यात आले आहे. याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एक महिन्यानंतर प्रत्यक्षात त्या ठिकाणी बॉश कंपनीकडून काम सुरू होईल.

                                        -अशोक घोरपडे, उद्यान अधीक्षक

Back to top button