पुणे उपनगरांतील उद्याने : काही फुललेली, तर बरीचशी कोमेजलेली ! | पुढारी

पुणे उपनगरांतील उद्याने : काही फुललेली, तर बरीचशी कोमेजलेली !

टीम पुढारी
पुणे  : शाळांना सुट्या लागल्याने उपनगरांतील विविध उद्याने मुलांच्या गर्दीने सध्या गजबजून जात आहेत. परिसरातील नागरिकही सकाळ-संध्याकाळी व्यायामासाठी इथे येतात. मात्र, बोटावर मोजण्याएवढ्या उद्यानांत दिलासादायक चित्र असले, तरी बहुतांश ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी असलेल्या साहित्यांची दुरवस्था झालेली आहे. यामुळे बच्चेकंपनीचा हिरमोड होत आहे. उपनगरांतील उद्यानांचा दै.’पुढारी’ने घेतलेला हा आढावा.

कात्रजची उद्याने सुस्थितीत

पुणे शहराचे दक्षिण प्रवेशद्वार असलेल्या कात्रजला घाट, डोंगररांगा, पाझर तलाव आदींचे निसर्गसौंदर्य लाभले आहे. राजीव गांधी प्राणिसंग्रहालय उद्यान, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यान, भगवान महावीर स्वामी उद्यानामुळे कात्रजच्या सौंदर्यात भर पडली आहे. ही उद्याने सध्या सुस्थितीत असून या ठिकाणी लहान मुले व नागरिकांची गर्दी होत आहे.
राजीव गांधी प्राणिसंग्रहालय व उद्यान, मोरेबागेतील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यान, सुखसागरनगर येथील भगवान महावीर स्वामी उद्यान, नानासाहेब पेशवे तलाव उद्यान, आजी-आजोबा पार्क, मोरया गार्डन, राजमाता उद्यान, दत्तनगर येथील उद्यान या उद्यानांची देखभाल-दुरुस्ती व्यवस्थितपणे केली जात आहे. उद्यानातील झाडी, रोपे, लॉन, लहान मुलांची खेळणी,जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम सुस्थितीत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
मात्र, काही ठिकाणी स्वच्छतागृहांतील नळ गायब झाले असून, अस्वछताही पसरल्याचे चित्र दिसून येत आहे. पुणे शहाराप्रमाणे उपनगरे ही लोकसंख्येने फुलू लागली आहेत. त्यामुळे आबालवृद्धांच्या मनोरंजन, विरंगुळा व आरोग्य सांभाळणार्‍या उद्यानांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.  उद्यानांसारख्या सार्वजनिक सुविधांचा लाभ घेताना त्या व्यवस्थित  वापरणे प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी असल्याचे मत कात्रज परिसरातील उद्यानप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
उद्यानांतील जॉगिंग ट्रॅक, ओपन जिमचा लाभ नागरिकांना होत आहे. सिमेंटच्या जंगलात उद्याने मनाला आनंद देत आहेत. कात्रज तलावात ओढ्याद्वारे वाहून येणारा कचरा व नागरिकांकडून टाकले जाणारे निर्माल्य याकडे प्रशासनाने लक्ष  देण्याची गरज आहे.
                                                   – श्रीराम कुलकर्णी, नागरिक, कात्रज
कात्रज परिसरातील उद्यानांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम नियमित करण्यात येत आहे. मात्र, सुरक्षारक्षक मर्यादित असल्यामुळे अपप्रवृत्तीच्या लोकांकडून स्वच्छतागृहांत चोर्‍या होतात. सार्वजनिक सुविधांचा लाभ घेताना सुरक्षेची काळजी घेणे प्रशासनासह नागरिकांचेही कर्तव्य आहे.
                                              – योगेश ताम्हाणे, उद्यान निरीक्षक

लोहिया उद्यान समस्यांच्या गर्तेत!

हडपसर परिसरातील डॉ. राममनोहर लोहिया उद्यानाची सध्या मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. उद्यानातील हिरवळ (लॉन) खराब झाली आहे. स्वच्छतागृहांची अवस्थाही बिकट झाली आहे. या उद्यानासमोर अतिक्रमणे झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाचे या उद्यानाकडे  दुर्लक्ष होत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.
मगरपट्टा चौकातील डॉ. लोहिया उद्यानातील हिरवळ अनेक दिवसांपासून बदललेली नाही. या ठिकाणी असलेल्या बाकड्यांचीदेखील दुरवस्था झाली आहे. पिण्याच्या पाण्याची टाकी धुतली जात नाही. हिरवळीचा पट दिवसेंदिवस खराब होत आहे. या ठिकाणी प्रेमी युगुल अश्लील चाळे करत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
उद्यानातील कारंजे बंद असून, त्या ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. उद्यान प्रवेशद्वारसमोर टपरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने उद्यानात येणार्‍या नागरिकांची गैरसोय होत आहे. उद्यान  विभागाने या समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
हडपसर परिसरातील नागरिकांची गैरसोय 
लोहिया उद्यान सध्या विविध समस्यांच्या गर्तेत अडकले आहे. दुरवस्था झालेली आसनव्यवस्था,  प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे, प्रवेशद्वारावर अतिक्रमणे, पाण्याच्या टाकीची अस्वच्छता आदी समस्यांमुळे या बागेेचे अस्तित्व हरपल्यासारखे वाटत आहे. पाणी नसल्याने झाडे सुकून चालली आहेत. सुरक्षारक्षकांची कमतरता असल्याने नागरिक वाहने उद्यानात आणत आहेत.
                                  -बाळासाहेब माने,  विकास हिंगणे, नागरिक
लोहिया उद्यानात असलेल्या विविध समस्यांबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांना कळविण्यात येईल. त्यानंतर उद्यानासाठी निधीची तरतूद करून या समस्या सोडविण्यात येतील. उद्यानात कुणी गैरप्रकार करताना आढळून असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. प्रवेशद्वारासमोरील अतिक्रमणांवरही कारवाई केली जाईल.
                                              -विजय नेवसे,  उद्यान निरीक्षक

Back to top button