राज्यात उष्णतेची लाट; आजपासून कोकण, मध्य महाराष्ट्रात अधिक तीव्रतेचा इशारा | पुढारी

राज्यात उष्णतेची लाट; आजपासून कोकण, मध्य महाराष्ट्रात अधिक तीव्रतेचा इशारा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात उष्णतेची लाट सक्रिय झाली असून, 12 मेपासून कोकण व मध्य महाराष्ट्रात ती अधिक तीव्र होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला. गुरुवारी राज्यात जळगाव शहराचा पारा 44.8 अंशावर, तर त्यापाठोपाठ पुणे शहरातील कोरेगाव पार्कचा पारा 44.4 अंशावर गेल्याने अंगाची लाही-लाही होत होती.

दरम्यान, बंगालच्या दक्षिण-पूर्व उपसागरात गुरुवारी मोखा हे चक्रीवादळ तयार झाले. त्याचा वेग ताशी 50 ते 60 कि. मी. असून, उद्या शुक्रवारी तो 80 ते 95 वर जाणार आहे. भारतीय किनारपट्ट्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती सुरू होती. कमी दाबाच्या पट्ट्यांतून गुरुवारी त्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले. आता ते बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पूर्व भागातून उत्तरेकडे जात असून, 14 मे रोजी ते बांगलादेशातील कॉक्सबाजार व म्यानमार येथील कायापट्टू बंदरावर धडकणार आहे. 15 मे रोजी हे चक्रीवादळ शांत होईल.

मोचा नव्हे, मोखा…

या वादळाचे मोचा नव्हे तर मोखा असे सुधारित नाव गुरुवारी हवामान विभागाने जाहीर केले. मोखा हे नाव येमेन देशाने दिले असून, तेथील एका बंदराचे नाव आहे. हे नाव झाडाचे असून ती एक आयुर्वेदिक वनस्पती आहे.

गुरुवारचे कमाल तापमान..

अकोला 43, गोंदिया 41, नागपूर 41.3, छत्रपती संभाजीनगर 41.4, परभणी 42.6, मुंबई 34.2, रत्नागिरी 34.8, कोल्हापूर 37.1, महाबळेश्वर 33.5, नाशिक 40.7, सांगली 38.5, सातारा 39.3, सोलापूर 41.5

उष्णतेची लाट तीव्र होणार

कोकण, मध्य महाराष्ट्रासह गुजरात व पश्चिम बंगालमध्ये 12 मेपासून तीव्र होणार आहे. दरम्यान महाराष्ट्रात कुठेही पावसाचा अंदाज नाही. राज्यात सर्वत्र शुष्क व कोरडे वातावरण राहणार आहे.

Back to top button