दक्षिण पुरंदरला वादळी वार्‍यासह पावसाचा तडाखा | पुढारी

दक्षिण पुरंदरला वादळी वार्‍यासह पावसाचा तडाखा

परिंचे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : परिंचे (ता. पुरंदर) परिसराला मंगळवारी (दि. 10) संध्याकाळी वादळी वार्‍यासह पावसाचा तडाखा बसला. वादळात गुरांचे गोठे, तरकारी व चारा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेचे तातडीने पंचनामे करण्यात आले असल्याचे गावकामगार तलाठी सुजित मंडलेजा यांनी सांगितले आहे. सटलवाडी, चौधरवाडी, यादववाडी, कांबळवाडी तसेच करवंदे वस्ती परिसरात अनेक गोठ्यांचे पत्रे उडून गेले. तसेच टोमॅटो व भोपळ्याचे पीक भुईसपाट झाल्याचे सटलवाडीचे सरपंच सागर करवंदे यांनी सांगितले.

परिंचे परिसरात वादळी वार्‍यामुळे चारा पिके जमीनदोस्त झाली आहेत. मका, ज्वारी, परिसरात टोमॅटो, वांगी, मिरची, गवार आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागासह महसूल विभागाने या पिकांचे पंचनामे करून शासनाने शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी सरपंच अर्चना राऊत, नुकसानग्रस्त शेतकरी धनसिंग जाधव यांनी केली आहे. उपसरपंच गणेश पारखी, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण जाधव यांच्यासह नारायण यादव, चंद्रकांत जाधव आदी शेतकरी या वेळी उपस्थित होते.

अनेक विद्युत खांब, तारा तुटल्या

वादळात अनेक ठिकाणी विद्युत खांब व तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणच्या कर्मचा-यांना रात्री उशिरापर्यंत काम करून काही ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले. मात्र परिंचे गावठाणात दोन ठिकाणी खांब पडल्याने चोवीस तास वीज पुरवठा खंडित झाला होता.

अस्मानी संकटाने शेतक-याला अश्रू अनावर

‘परिसरात अनेक झाडे पडली असून, फळबागांनाही वादळाचा फटका बसला आहे. अस्मानी संकटामुळे आमचे तरकारी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता आम्ही संसाराचा गाडा चालवायचा कसा?’ हे सांगताना शेतकरी धनसिंग जाधव व त्यांच्या पत्नी यांना अश्रू अनावर झाले होते.

Back to top button