खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहतींचा ‘कचरा’; डेपोतील कचर्‍याने आजाराला निमंत्रण | पुढारी

खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहतींचा ‘कचरा’; डेपोतील कचर्‍याने आजाराला निमंत्रण

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : खेड तालुक्यातील चाकण एमआयडीसीतील खराबवाडी परिसरातील अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय औद्योगिक कंपन्या सध्या येथील कचरा डेपोमुळे प्रचंड त्रस्त आहेत. येथील कचरा डेपोला गेले काही महिन्यांपासून दररोज मोठ्या प्रमाणात आग लावली जाते. आग लागली की ही आग शमत नाही आणि प्रदीर्घ काळ धुमसत राहते. परिणामी परिसरात धुराचे प्रचंड लोट तयार होतात. यामुळे परिसरातील कंपन्यांमधील कर्मचारी व नागरिकांचा जीव गुदमरत असून, अनेकांना आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

या संदर्भात संबंधित नगरपालिका, ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, एमआयडीसी सर्वांना लेखी तक्रार देऊन देखील अद्याप काहीही कारवाई झाली नाही. या संदर्भात परिसरातील औद्योगिक कंपन्यांनी पोलिसात लेखी तक्रार देऊन गुन्हा देखील दाखल केला. सर्व स्तरावर तक्रारी दाखल करून देखील या अत्यंत गंभीर प्रश्नाची अद्याप कोणीच दखल घेतली नाही.
आपल्या राज्यातील औद्योगिक कंपन्या बाहेरच्या राज्यात गेल्यावर सर्वच स्तरावर प्रचंड गदारोळ केला जातो, पण सध्या चाकण एमआयडीसीतील अनेक कंपन्या, लहान मोठे व्यावसायिक विविध कारणांनी त्रस्त आहेत.

चाकण एमआयडीसीतील खराबवाडी येथे लगतच्या ग्रामपंचायती, चाकण नगरपालिकेचा कचरा डेपो आहे. याच परिसरात डीव्हीएस, एटलस कॉप्को, रत्नेश इसताप, रूप पॉलिमार, नवविकास काऊंटर, जेनीने ऑटो, स्टलिंग बिल्डिंग सोल्यूशन, शिव इंडस्ट्रीज, हरी ओम इंडस्ट्रीज, गुरूकृपा फॅब्री केटर्स, स्टॅनले ब्लॅक अ‍ॅन्ड डेकर अशा मोठ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय औद्योगिक कंपन्या व अनेक लहान, मोठे व्यावसायिक आहेत. परंतु गेले काही महिन्यांपासून या परिसरातील कचरा डेपोला दररोज आग लावली जाते. या आगीचे लोट व नंतर निर्माण होणा-या विषारी धुराचा परिसरातील कंपन्यांमध्ये काम करणा-या कर्मचा-यांना प्रचंड त्रस्त होतो. यामुळे कंपनीतील कर्मचा-यांचे, परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे.

अनेक कर्मचार्‍यांना डोकेदुखी, घशात दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, मळमळणे आदी त्रास सुरू झाले आहेत. या संदर्भात संबंधित कंपन्यांनी एकत्र येऊन, वैयक्तीकरित्या विविध प्रशासकीय स्तरावर लेखी तक्रारी केल्या आहेत, लगतच्या पोलिस ठाण्यात देखील तक्रार दाखल केली आहे, परंतु या गंभीर प्रश्नाकडे झोपलेल्या प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

कच-यामुळे अनेक कंपन्या अन्य राज्यात जातील

सध्या खेड तालुक्यातील चाकण एमआयडीसीत इतर पायाभूत सुविधांचा तर मोठा अभाव आहेच, पण कच-याच्या प्रश्नावर अनेक कंपन्या प्रचंड त्रस्त आहेत. कंपन्याच्या परिसरातील, सीमा भिंतीलगत टाकल्या जाणा-या कच-यामुळे कंपन्यांच्या बाहेरील देशातून येणा-या ग्राहकांसमोर प्रचंड नाचक्की होते, याबाबत प्रश्न उपस्थित केले जाता. याकडे प्रशासन व शासनाच्या स्तरावर दुर्लक्ष केले जाते. यामुळेच भविष्यात कच-याच्या त्रासाला कंटाळून काही कंपन्या गुजरात अथवा अन्य राज्यात केल्या तर आश्चर्य वाटायला नको, अशी सध्या चाकण एमआयडीसीतील परिस्थिती आहे.

Back to top button