पुणे : नर्सिंग अभ्यासक्रमांमध्ये हवेत गुणात्मक बदल; रुग्णांच्या सेवेसाठी डॉक्टरांप्रमाणेच परिचारिकांचीही गरज | पुढारी

पुणे : नर्सिंग अभ्यासक्रमांमध्ये हवेत गुणात्मक बदल; रुग्णांच्या सेवेसाठी डॉक्टरांप्रमाणेच परिचारिकांचीही गरज

प्रज्ञा सिंग-केळकर

पुणे : वैद्यकीय क्षेत्रात नवनव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येत असल्याने रुग्णांच्या सेवेसाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यास डॉक्टरांप्रमाणेच प्रशिक्षित परिचारिका म्हणजे नर्सेसचीही गरज असल्याचे समोर येत आहे, त्यामुळे केवळ पारंपरिक शिक्षणामध्ये बदल करून अभ्यासक्रमांमध्ये गुणात्मक बदल होण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. परिचारिका हा वैद्यकीय क्षेत्राचा महत्त्वाचा कणा मानला जातो. विशेषतः कोरोना काळात परिचरिकांचे महत्त्व ठळकपणे अधोरेखित झाले.

नर्सिंगच्या क्षेत्रात शिक्षण घेणार्‍यांचे प्रमाणही वाढत आहे. भारतासह परदेशातही नर्सिंग क्षेत्राला वलय प्राप्त झाले आहे. आता वैद्यकीय क्षेत्रात नवे तंत्र वापरले जात आहे. त्यामुळे नर्सिंगमध्ये फॉरेन्सिक नर्सिंग, आर्टर्फिशियल इंटिलिजन्स यांसह अद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञान प्रशिक्षणाचा समावेश झाल्यास वैद्यकीय व्यवसायाचा कणा आणखी सशक्त होऊ शकेल. यासाठी बी.एस्सी., एम.एस्सी.सह अ‍ॅडव्हान्स अभ्यासक्रमांमध्ये कालानुरूप बदल होण्याची आवश्यकता आहे.

महाराष्ट्रातील बी. एस्सी. अभ्यासक्रम असलेली नर्सिंग महाविद्यालये
अभ्यासक्रम – महाविद्यालये- विद्यार्थी
बेसिक बी.एस्सी. 110 7880
पोस्ट बेसिक बी.एस्सी. 54 1760

सुरुवातीच्या काळात नर्सिंग क्षेत्र केवळ महिलांचे मानले जात होते. आता मुलांचे या क्षेत्रातील प्रमाण बर्‍यापैकी वाढत असून, शून्यावरून 10 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील बदलानुसार नर्सिंग क्षेत्रातही तंत्रज्ञानाच्या दृष्टीने बदल होऊ घातले आहेत. त्यादृष्टीने अभ्यासक्रमात भविष्यात बदल होतील. सध्या तरी रोबोटीक सर्जरी, शवविच्छेदन याबाबतचे प्रशिक्षण समाविष्ट करण्यात आलेले नाही.

 डॉ. विनायक सावरडेकर, वैद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, मुंबई

बी. एस्सी. नर्सिंगच्या अभ्यासक्रमामध्ये 2021 मध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये थिअरीऐवजी प्रत्यक्ष काम आणि सरावावर भर देण्यात आला आहे. यामध्ये बायोइन्फर्मेटिक्स, सर्जकिल टेक्नॉलॉजी आदी बाबींचा समावेश आहे. आर्टिफिशियल इंटिलिजन्स पद्धतीची ओळखही करून देण्यात येत आहे. नर्सिंगच्या क्षेत्रात आता मुलांचे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. इंडियन नर्सिंग कौन्सिल आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तंत्रज्ञानस्नेही काम आणि रुग्णसेवेच्या दृष्टीने नर्सिंग क्षेत्र अद्ययावत होत आहे.

डॉ.कल्पना कांबळे, प्राचार्य, कॉलेज ऑफ नर्सिंग बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे

कोल्हापूर शासकीय महाविद्यालयात नर्सिंगमध्ये एएनएम आणि जीएनएमचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. बी. एस्सी. नर्सिंगच्या अभ्यासक्रमाला परवानगी मिळावी, यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यासाठी कॉलेज आणि हॉस्टेलसाठी लागणार्‍या पायाभूत सुविधांची तयारी सुरू आहे.

 डॉ. प्रदीप दीक्षित, अधिष्ठाता, कोल्हापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

Back to top button