पुणे : …त्या खुनातील आरोपींची पोलिसांनी काढली धिंड | पुढारी

पुणे : ...त्या खुनातील आरोपींची पोलिसांनी काढली धिंड

पुणे / मुंढवा; पुढारी वृत्तसेवा : घर आणि गोठ्याजवळ नशा करत बसलेल्या टोळक्याला व्यावसायिकाने हटकले. त्यामुळे टोळक्याने कोयत्याने वार करून व्यावसायिकाचा खून केला होता. तसेच नागरिकांमधील गुन्हेगारांची दहशत कमी व्हावी, यासाठी नागरिकांनी आरोपींची धिंड काढण्याची मागणी बैठका घेऊन मुंढवा पोलिसांकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या सात जणांची मुंढवा पोलिसांनी मुंढवा-केशवनगर परिसरातून धिंड काढली. या वेळी दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे नागरिकांनी कौतुक केले.

मुंढवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजित लकडे यांच्यासह त्यांच्या पोलिस ठाण्याची पथके केशवनगर आणि मुंढवा भागात सकाळ, दुपार, संध्याकाळ पेट्रोलिंगद्वारे, नाकाबंदी करून ट्रीपलसिट प्रवास करणारे, तसेच संशयास्पद वाटणार्‍यांची चौकशी करीत आहेत. गुन्हेगारांना अशाच पध्दतीने शासन झाले पाहिजे, असेही नागरिकांनी या वेळी बोलून दाखविले.

घटनेनंतर परिसरातील तब्बल शंभरहून अधिक सराईतांची झाडाझडती घेतली. मुंढवा पोलिस ठाण्याच्या परिसरात जेवढे आरोपी आहेत त्या सराईत गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात आणून त्यांच्याकडून सामाजिक शांतता भंग होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. त्याबरोबरच रायझिंग स्टार गुन्हेगारांना दिवसातून दोन वेळा तपासले जात आहे.

Back to top button