इंद्रायणी नदी उशाला तरीही कोरड घशाला | पुढारी

इंद्रायणी नदी उशाला तरीही कोरड घशाला

देहुगाव : संतांची भूमी असलेल्या या देहूनगरीत 85 टक्के लोक हे देहूगावच्या बाहेर राहत आहेत. परिसरात दहा-दहा मजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. परंतु, अद्याप या सोसायट्यांमधील रहिवाशांना पिण्याचे पाणी स्थानिक प्रशासन देऊ शकले नाही. त्यामुळे घशाला पडलेली कोरड घालविण्याकरिता या भागातील रहिवाशांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

पाण्यासाठी नागरिकांची पायपीट
भीमाशंकर, गंधर्वनगरी, शिवनगरी अशा मोठं-मोठ्या सोसायट्या परिसरात उभ्या राहिल्या आहेत. ते घरपट्टी भरतात. गृहप्रकल्प व्यावसायिक सर्व प्रकारचे पैसे वसूल करतात. परंतु. त्यांना अद्याप पिण्याचे पाणी मिळाले नाही. तर, जलसेवा केंद्रातून पाणी आणण्यासाठी दररोज पायपीट करावी लागत आहे. शिवाय आर्थिक झळदेखील सोसावी लागत आहे. पाणी मिळत नसल्याने काही लोक आपली घर विकून गाव सोडून जाऊ लागले आहेत.

रस्त्यांवर मोठमोठे खड्डे
पिण्याचे पाणी तर आवश्यक आहेच. परंतु, रस्तेही पक्के नाहीत. रस्त्यावर पडलेले खड्डे, खड्यातील गाळ मिश्रित पाणी अशा कठीण परिस्थितीत प्रवास करणे, रहिवाशांना त्रासदायक झाले आहे. इंद्रायणी नदीला मुबलक पाणी असते. तरीही सोसायट्यांमध्ये राहणार्‍यांना पाणी मिळत नसेल तर, पाणी उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती सदनिकाधारकांची झाली आहे. तरीही या ढिम्म प्रशासनाला जाग कशी येत नाही? असा प्रश्न रहिवासी विचारु लागले आहेत.

प्रशासनाचे दुर्लक्ष
या अशा अनेक सोसायटयांमधे पाणी, रस्ते, वीजपुरवठा करण्याचे काम स्थानिक प्रशासनाचे आहे. अनेक सोसायट्या, घरांच्या नोंदी झाल्या आहेत. त्याची घरपट्टी भरली जात आहे. गृहप्रकल्प राबविताना बांधकाम व्यावसायिकाकडून पीएमआरडीए कोट्यवधी रुपये वसूल करते. मग अशा सदनिकाधारक तसेच सोसायट्यांमधील रहिवाशांना पाणी, वीज, रस्ते आदी मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी शासनाची नाही का? असा प्रश्न रहिवासी विचारू लागले आहेत.

काही सोसायट्यांमध्ये चार ते पाच दिवसांतून एकदा पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे काही सोसायट्यांमध्ये पाण्याच्या बाबतीत कभी खुशी, कभी गम अशी अवस्था असते. प्रशासन आणि गाव या मधील दुवा असणारा पूर्वीचा ग्रामसेवक आणि सध्याचे मुख्याधिकारी आणि सत्ताधारी, पदाधिकारी व प्रशासन यांनी पाण्यासारखा ज्वलंत प्रश्न सोडविण्याची मागणी केली जात आहे.

बाहेरील जिल्ह्यांतील नागरिकांच्या संख्येत वाढ
देहूगावची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी चिंचवड हद्दीत सदनिका घेणे घराचा स्वप्न पूर्ण करता येत नाही. अशांनी देहूगावात सदनिका खरेदी केल्या आहेत. तर, काहींनी अर्धा एक गुंठा जागा खरेदी करून काहींनी स्व:ताच्या मनातील घराची स्वप्न पूर्ण केली आहेत. अनेक मजली इमारतीं उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे देहूत फक्त 15 टक्के येवढी गावठाणत लोकसंख्या आहे. तर, वडाचा माळ, निसर्ग सोसायटी, गंधर्वनगरी, शिवनगरी अशा अनेक सोसायट्यांमध्ये 85 टक्के नागरिक परजिल्हा आणि बाहेरील राज्यातील वास्तव्य करीत आहेत.

Back to top button