

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयात उपचार घेण्यासाठी हेल्थ कार्ड सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी सर्व्हर खरेदीसाठी 3 कोटी 1 लाख 55 हजार इतका खर्च केला जाणार आहे. हेल्थ कार्डमुळे रूग्णांच्या आजाराबाबत डॉक्टरांना तात्काळ माहिती कळते. त्यामुळे डॉक्टरांना उपचार करणे सुलभ होते. त्याकरीता पालिकेने वायसीएम रूग्णालयात उपचार घेणार्या रूग्णांसाठी हेल्थ कार्ड प्रणाली सुरू केली आहे.
त्यासाठी सर्व्हर खरेदी करण्यासाठी मध्यवर्ती भांडार विभागाने 3 कोटी 1 लाख 55 हजार खर्चाची दोन वेळा निविदा प्रसिद्ध केली होती. त्यात एकूण 4 निविदा पात्र ठरल्या. पोलस्टार कन्सल्स्टींग प्रा. लि. यांची सर्वांत कमी दराची निविदा स्वीकारण्यात आली आहे. त्या खर्चास आयुक्त शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे. त्यानुसार पोलस्टार कन्सल्टींग हे वायसीएम रूग्णालयात हेल्थ कार्डचे सर्व्हर बसवून देणार आहेत.