पुणे; पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याची सुनावणी पूर्ण झाली असून, आता ऑर्डर होणार आहे. त्यासंदर्भात न्यायालय जो काही निर्णय देईल त्याचा पूर्ण सन्मान देशातील नागरिक करतील, असे स्पष्ट मत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले.
भारती विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात आल्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर नार्वेकर तसेच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'जे नागरिक संविधानावर विश्वास ठेवतात, लोकशाहीवर विश्वास ठेवतात ते संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांचादेखील आदर ठेवतील, असा मला विश्वास आहे.'
'अध्यक्ष म्हणून तुमची जबाबदारी मोठी आहे यासंदर्भात तुम्हाला काय वाटते ?' या पत्रकारांच्या प्रश्नावर नार्वेकर म्हणाले, 'अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी केवळ उद्यापासून महत्त्वाची नाही तर मी जेव्हापासून अध्यक्षपदी विराजमान झालो आहे तेव्हापासूनच मी जबाबदारीने कार्य करत आहे. मी दोन ते तीन दिवसांसाठी परदेशात जात आहे, त्यामुळे सुनावण्या आणि अन्य कार्य सुरळीत सुरू राहणार आहे,' असेदेखील नॉर्वेकर यांनी स्पष्ट केले.
राजस्थान राज्यात कुणी कुणावर विश्वास ठेवायला तयार नाही. या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपावर गेहलोत म्हणाले, 'मोदी आणि शहा हे कायम इलेक्शन मोडमध्ये असतात. राजस्थानमध्ये आठ महिन्यांनतर निवडणुका होणार आहेत. त्यातच कर्नाटक निवडणुकांमधून बाहेर पडताच ते राजस्थानच्या निवडणुकांच्या कामाला लागले आहेत. पंतप्रधान येणार असल्यामुळे सरकारी प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना आणण्यासाठी मी गेलो;
परंतु त्या ठिकाणी ते असे काही बोलले जे त्यांनी बोलणे अपेक्षित नव्हते. कर्नाटकात प्रचंड बहुमताने काँग्रेस जिंकणार आहे तर राजस्थानमध्येदेखील काँग्रेसचा विजय निश्चित आहे. कारण, त्या ठिकाणी उत्तम प्रशासन आम्ही दिलेले आहे. राजस्थानमध्ये ज्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत त्या योजना अन्य राज्यांनी राबविण्यास सुरुवात केली आहे.राज्यात महागाई कशी कमी होईल याकडे आमचे लक्ष राहणार आहे,' असेदेखील गेहलोत यांनी स्पष्ट केले.