पुणे : क्रीडा गुणांसाठी खेळांनाच मान्यता; दिव्यांगांच्या 3 स्पर्धांचा समावेश | पुढारी

पुणे : क्रीडा गुणांसाठी खेळांनाच मान्यता; दिव्यांगांच्या 3 स्पर्धांचा समावेश

पुणे; पुढारी वृत्तसेवा : माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रविष्ट होणार्‍या खेळाडू विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्याबाबतच्या प्रस्तावावर केवळ 49 खेळांनाच मान्यता दिली आहे. 43 खेळांबाबतचा प्रस्ताव अद्यापही प्रलंबित असून, त्यांना न्याय मिळणार का, असा प्रश्न खेळाडूंकडून उपस्थित केला जात आहे.

शासनाने निर्धारित केलेल्या 49 खेळ प्रकारांमधील महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन तसेच केंद्र शासनाच्या क्रीडा विभागाशी संलग्न व क्रीडागुणांसाठी पात्र असलेल्या एकविध खेळांच्या राज्य संघटना, राष्ट्रीय एकविध खेळ संघटना/फेडरेशनच्या खेळांचा समावेश आहे.

या खेळातील पात्र ठरणार्‍या खेळाडूंना क्रीडा गुणांची सवलत मिळणार असून, विभागीय शिक्षण मंडळास तशी शिफारस जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांमार्फत केली जाणार आहे. या ग्रेस गुणांपासून खेळाडू वंचित राहिल्यास जिल्हा क्रीडा अधिकारी तसेच संबंधित कर्मचार्‍यावर शिस्तभंग कारवाई करण्याचे आदेशही क्रीडा संचालनालयाच्या आयुक्तांनी दिले आहेत.

हे खेळ आणि स्पर्धांचा समावेश

अ‍ॅथलेटिक्स, बॉक्सिंग, सायकलिंग, तलवारबाजी, फुटबॉल, ज्युदो, टेबल टेनिस, वुशू, वेटलिफ्टिंग, सॉफ्टबॉल, बेसबॉल, बुध्दिबळ, स्क्वॅश, रग्बी, कुस्ती, आर्चरी, जिम्नॅस्टिक, रायफल शूटिंग, बॅडमिंटन, हॅण्डबॉल, टेनिस, हॉकी, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, जलतरण, तायक्वांदो, नेटबॉल, मॉडर्न पँटॅथलॉन, कबड्डी, खो-खो, सॉफ्टटेनिस, सेपक टकरा, मल्लखांब, आट्यापाट्या, बॉलबॅडमिंटन, कॅरम, रोलबॉल, किकबॉक्सिंग, योगासन, शूटिंगबॉल, टेनिक्वाईट, रोलर स्केटिंग, कराटे, दिव्यांग क्रीडा स्पर्धा, गतिमंदांच्या क्रीडा स्पर्धा, कर्ण/मूकबधिर क्रीडा स्पर्धा.

शासनाच्या वतीने महाराष्ट्र ऑलिम्पिक, इंडियन ऑलिम्पिक, नॅशनल फेडरेशन आणि स्कूल फेडरेशनच्या मान्यतेने होणार्‍या तब्बल 49 खेळांच्या ग्रेस गुणांना मान्यता दिली आहे. 43 खेळांच्या ग्रेस गुण मान्यतेसाठी संबंधित संघटनांकडून एकत्रित अहवाल मागविण्यात आला आहे. हा अहवाल शासनाला सादर झाल्यानंतर त्यावर निर्णय अपेक्षित असून, तो प्रस्ताव शासन स्तरावर आहे.

                           अनिल पाटील, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय

Back to top button