पुणे : कुकडी डावा कालव्याचे 22 मेपासून चौथे आवर्तन

पुणे : कुकडी डावा कालव्याचे 22 मेपासून चौथे आवर्तन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची आणि शेतकर्‍यांची मागणी लक्षात घेता कुकडी डावा कालव्यातून 22 मेपासून चौथे आवर्तन सोडण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. कुकडी प्रकल्प व घोड प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे पार पडली. या वेळी आमदार प्रा. राम शिंदे, रोहित पवार, अतुल बेनके, अशोक पवार (दूरदृश्यप्रणालीद्वारे), कालवा सल्लागार समितीचे सदस्य सुदाम पवार, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, महाराष्ट्र कृष्णाखोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता (वि. प्र.) हेमंत धुमाळ आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, धरणातून कालव्यात सोडण्यात आलेले पाणी अपेक्षित क्षमतेने कालव्याच्या शेवटच्या क्षेत्राला (टेल) मिळावे, पाण्याची गळती रोखण्यासाठी महामंडळाच्या अधिकार्‍यांनी उपाययोजना कराव्यात, नदीवरील तसेच कालव्यावरील अनियंत्रित व अनधिकृत पाणी उपशावर नियंत्रण आणावे, या प्रकल्पातून पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेती, पिण्यासाठी आणि उद्योगांना पाणी दिले जाते, पाण्याचे आवर्तन सोडताना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घ्याव्यात. त्यामुळे सर्व घटकांना समन्यायी पद्धतीने पाणी मिळेल, याकडे लक्ष द्यावे.

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागात मनुष्यबळ कमतरतेचा मुद्दाही या वेळी चर्चिला गेला. सध्या शासनाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रिक्त पदभरतीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून प्रक्रियाही सुरू आहे. तूर्तास 'क' आणि 'ड' संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने भरून काम सुरू करावे, अशा सूचनाही पालकमंत्री पाटील यांनी या वेळी जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या. बैठकीच्या सुरुवातीला कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी नियोजनाबाबत सादरीकरण केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news