पुणेकरांनो सावधान…! शहरात उष्णतेची लाट; एवढ्या अंशांनी तापमान वाढले ? | पुढारी

पुणेकरांनो सावधान...! शहरात उष्णतेची लाट; एवढ्या अंशांनी तापमान वाढले ?

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरात उष्णतेची लाट सक्रिय झाली असून, कमाल तापमानाने 34 वरून 40.1 अंशांवर उंच उडी घेतली आहे. त्यामुळे हवामान विभागाने दुपारी 1 ते 4 काम नसेल, तर बाहेर फिरू नका, असा सल्ला दिला आहे. बुधवारी शिवाजीनगर 40.1, तर कोरेगाव पार्कचा पारा 42.8 अंशांवर गेला होता.

बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळ सक्रिय होताच हवामानात मोठे बदल झाले. राज्यात उष्णतेची लाट तीव— आली. बहुतांश शहरांचे तापमान 40 अंशांवर गेले. पुणे शहरातील शिवाजीनगरचा पारा 40.1, तर कोरेगाव पार्कचा पारा 42.8 अंशांवर गेला होता. त्यामुळे पुणे वेधशाळेने शहराला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

72 तासांत हंगामातील सर्वाधिक तापमान

पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार शहराचा पारा कोरेगाव पार्क वगळता यंदा 40 अंशांवर फार कमी वेळा गेला. मे महिन्यात अगदी 8 मे पर्यंत शहराचे कमाल तापमान 34 अंशांवर होते. त्यात 7 अंशांनी वाढ होऊन बुधवारी 10 मे रोजी पारा 40.1 अंशांवर गेला, तर कोरेगाव पार्क चा पारा यंदा तीन वेळा 42 अंशांवर गेला होता. तो मे महिन्यात प्रथमच 42.8 अंशांवर गेला. या तापमानात आगामी 72 तासांत 3 ते 4 अंशांनी वाढ होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे.

बुधवारपासून चक्रीवादळ सक्रिय होताच हवामानात मोठे बदल झाले आहेत. वातावरणातील बाष्प वादळ शोषून घेत असल्याने उष्णतेची लाट सक्रिय होत आहे. शहराचे कमाल तापमान 34 वरून 40 अंशांवर गेले. त्यात आणखी 3 ते 4 अंशांनी वाढ होणार आहे. नागरिकांनी काम नसेल तर दुपारी 1 ते 4 या वेळेत बाहेर पडू नये. भरपूर पाणी प्या, बाहेर गेलात तर सावलीत, थंड जागेवर काम करा.

                                        -अनुपम कश्यपि, अंदाज विभाग प्रमुख, पुणे

Back to top button