५३ लाखांच्या दरोड्याचा बारामती तालुका पोलिसांकडून छडा, सहा दरोडेखोरांच्या आवळल्या मुसक्या

५३ लाखांच्या दरोड्याचा बारामती तालुका पोलिसांकडून छडा, सहा दरोडेखोरांच्या आवळल्या मुसक्या
Published on
Updated on

बारामती (पुणे), पुढारी वृत्तसेवा: माल घेऊन निघालेल्या ट्रक चालकाचे जबरदस्तीने अपहरण करून सुमारे ३५ लाख रुपयांचे लोखंडी राॅड दरोडा टाकून लुटणाऱ्या टोळीला बारामती तालुका पोलिसांनी अटक केली. बारामती न्यायालयाने या आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दिग्विजय श्रीकांत जाधव (वय २१), लक्ष्मण भीमराव कुचेकर (वय ३०), सुहास रावसाहेब थोरात (वय २८, तिघे रा. उदमाईवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे), प्रथमेश मनोज शेलार (वय २३, रा. घोलपवाडी, ता. इंदापूर), मयुर प्रकाश शिंदे (वय २८, रा. तावशी, ता. इंदापूर) व स्वप्निल दत्तात्रय निंबाळकर (वय २८, रा. ३९ फाटा, सणसर, ता. इंदापूर) अशी पोलिसांनी अटक केलेल्या दरोडेखोर तरुणांची नावे आहेत.

या प्रकरणी मारुती मोतीलाल करांडे (वय ३०, रा. आसंगी, ता. जत, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली होती. मंगळवारी (दि. ९) रोजी ही घटना घडली होती. करांडे हे स्वतःच्या मालकीचा अशोक लेलॅण्ड ट्रक (एनएल-०१, एबी-३५७७) मधून बारामती एमआयडीसीतील माऊली कृपा ट्रान्सपोर्ट मार्फत कर्नाटक येथून लोखंडी राॅड भरून पुण्यात मुंढवा येथील भारत फोर्जमध्ये घेऊन जाण्यासाठी निघाले होते. भिगवण जवळ बबिता ढाबा येथे ते पहाटे ३ च्या सुमारास जेवणासाठी थांबले. त्यानंतर ते गाडीतच झोपले असताना दरवाजा उघडून तिघांनी आत येत त्यांना दमदाटी केली आणिचार हजार रुपयांसह मोबाईल काढून घेतला. ट्रक सुरु करून तो बारामतीच्या दिशेने आणला. भिगवणमध्ये त्यांना आणखी तीन साथीदार मिळाले. त्यांनी या ट्रकमधून ३५ लाख रुपये किमतीचे लोखंडी राॅड चोरले. तसेच १९ लाख रुपयांचे वाहनही त्यांनी नेले. करांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञाताविरोधात दरोड्याचा व जबरी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

आरोपींनी बारामती तालुक्यातील कन्हेरी गावच्या हद्दीत पालखी महामार्गालगत हे वाहन आणले. तेथून दुसऱ्या वाहनात हे राॅड टाकून ते दुसरीकडे नेवून विकण्याचा त्यांचा हेतू होता. करांडे यांनी त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत बारामती तालुका पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेत तात्काळ पथके रवाना केली. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याचे काम सुरु असतानाच ट्रकसह दोन दरोडेखोरांना जागीच पकडण्यात आले. त्यांच्याकडून इतर साथीदारांची माहिती घेत आजूबाजूच्या झाडाझुडपात लपून बसलेल्या अन्य चार जणांना पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले.

बारामती न्यायालयाने या सहा जणांना १२ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींनी यासारखे आणखी काही गंभीर गुन्हे केले आहेत का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. ही कामगिरी पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे, उपनिरीक्षक डी. बी. लेंडवे, हवालदार राम कानगुडे, शशिकांत दळवी, संतोष मखरे, शिंगाडे, रावसाहेब गायकवाड, अतुल पाटसकर, तुषार लोंढे, दीपक दराडे, अजित भाग्यवंत आदींनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news