

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती-निरा या राज्यमार्गावरील धोकादायक झाडे हटविण्याची गरज आहे. झाडांच्या फांद्या अपघाताला कारणीभूत ठरत असून, रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. सर्वाधिक वाहतूक असलेल्या या रस्त्यावरील पूल व रस्त्याची दुरुस्तीचे काम झाल्याने वाहनचालकांचा वेग वाढला आहे. रस्त्याच्या दुतर्फा झाडांची संख्या जास्त आहे. मात्र, झाडांच्या फांद्या थेट जड वाहनांना लागत आहेत, त्यामुळे या झाडांच्या फांद्या आणि धोकादायक झाडे सार्वजनिक बांधकाम विभागाने काढण्याची मागणी होत आहे. तालुक्यातील सर्वाधिक वाहतूक या रस्त्यावरून होत असते, त्यामुळे जड वाहनांसाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे.
बहुतांश ठिकाणी दाट झाडी आहे. वडाची झाडे शंभर वर्षांपूर्वीची असल्याने त्यांच्या फांद्या रस्त्यावर लोंबकळत आहेत, याशिवाय काही झाडे रस्त्याच्या अगदीच जवळ आहेत. अशा झाडांना वाहने धडकून मोठे अपघात झाले आहेत. पर्यायाने अशी झाडे व फांद्या काढण्याची मागणी वाहनचालक करत आहेत. निरा- बारामती मार्गावरील पणदरे व खामगळवाडी येथील धोकादायक पुलांचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केले, मात्र करंजेपूल आणि निंबुत येथील ओढ्यावरील काम रखडले आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम होण्याची शक्यता नाही, त्यामुळे निंबुत येथील ओढ्याला पाणी आल्यास वाहतूक ठप्प होणार आहे.
अपघातानंतर संबंधितांना जाग येणार का?
पावसाळ्यापुर्वीच या रस्त्यावरील खड्डे बुजवावे लागणार आहेत. कठीणपूल ते पेशवेवस्ती या ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. अनेकदा मागणी करूनही येथील रस्त्याची दुरुस्ती होत नाही. एखादा अपघात झाल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का? असा सवाल विचारला जात आहे.