येरवडा : पुढारी वृत्तसेवा : येरवडा येथे माजी नगरसेविकेच्या घरासमोर लावलेल्या चार चाकी गाड्यांची रात्रीच्या वेळी तोडफोड झाल्याची घटना पांडू लमाण वस्ती येथे रात्रीच्या वेळी घडली. चार महिन्यांपूर्वी या ठिकाणी सुभाष उर्फ पापा राठोड,अनिल उर्फ पोपट वाल्हेकर या दोघांचा चव्हाण गँगनी धारधार हत्याराने खून केला होता. त्यातील तीन आरोपीची नुकतीच जामीनावर सुटका झाली होती. आरोपी जामिनावर सुटल्याच्या रागातून 'खून का बदला खून' से घेण्यासाठी रागातून खून झालेल्या राठोड गटातील तरुणांनी रात्रीच्या अंधारात आरोपीच्या घराच्या आजूबाजूला पार्किंग केलेल्या गाड्या फोडल्याचा संशय येरवडा पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी तिघाविरोधात तोडफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
यामध्ये चार चाकी, रिक्षा, दुचाकी अशा गाड्यांचा समावेश आहे. याप्रकरणी नुकताच जामीनावर सुटलेल्या शंकर माणू चव्हाण यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून ते शिवसेनेच्या माजी नगरसेविका श्वेता चव्हाण यांचे सासरे आहेत. या प्रकरणी येरवडा पोलीस अधिक तपास करत आहेत.