पुणे : राम नदी होतेय अस्वच्छ ! गावातील तसेच बांधकामांचे सांडपाणी थेट नदीत | पुढारी

पुणे : राम नदी होतेय अस्वच्छ ! गावातील तसेच बांधकामांचे सांडपाणी थेट नदीत

बावधन (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा :  देशातील सर्वांत छोटी नदी असा उल्लेख असणार्‍या, मुळशी तालुक्यातील भुकूम येथे उगम पावलेली राम नदी सध्या मुळशी तालुक्यातील सर्वांत अस्वच्छ नदी म्हणून ओळखली जात आहे. पुरातन काळात भुकूम येथील रामेश्वर ते पाषाण येथील सोमेश्वर असा 12 ते 13 किलोमीटर असलेली एकेकाळी सुंदर आणि स्वच्छ असलेली राम नदी आता गटारगंगा झाली आहे. भुकूम, भूगाव, बावधन आणि पाषाण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत असताना बांधकाम व्यावसायिकांनी नियम धाब्यावर बसवत सांडपाणी, तसेच मैलापाणी हे सरसकट राम नदीत सोडून दिल्यामुळे या नदीची गटारगंगा झाली.

भुकूममध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली. त्यामध्ये काही अधिकृत, तर काही अनधिकृत आहेत. यातील काही बांधकाम व्यावसायिकांनी त्यांच्या प्रकल्पातील सांडपाणी प्रक्रिया करून, तर काहींनी तसेच हे नदीत सोडले. याचा परिणाम छत्रपती शिवाजी महाराज जलाशयावर झाला असून, हा जलाशयसुद्धा सांडपाणी युक्त झाला आहे. दहा वर्षांपूर्वी या जलाशयाचे पाणी भूगाव आणि भुकूमकर उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी वापरायचे. परंतु, आज परिस्थिती अशी आहे की हे पाणी पिण्यासाठी तर सोडाच, पण पाण्यात पाय टेकवायचा असेल तरी नको वाटते, इतके अस्वच्छ आहे.

एवढे घाणेरडे पाणी सध्या या जलाशयामध्ये दररोज लाखो लिटरने जात असून, याकडे वेळीच लक्ष दिले असते, तर ही वेळ आज आली नसती. असे स्थानिकांचे म्हणणे आहे. तत्कालीन सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच पीएमआरडीएचे अधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी या सर्वांनी या अतिशय गंभीर अशा प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आणि आज दोन्हीही गावांना पाण्यासाठी दाही दिशा वणवण फिरावे लागत आहे. भविष्यामध्ये हेच पाणी आपल्याला वापरायला लागणार आहे, असा पुसटसा विचारही त्यांच्या मनामध्ये का आला नाही, असा संतप्त सवाल सध्या दोन्ही गावांतील नागरिक करीत आहेत. ज्या राम नदीतील पाणी स्थानिक शेतकरी पूर्वी पावसाळ्यामध्ये भात पिकासाठी वापरायचे, त्याच राम नदीतील पाणी आज विषयुक्त झाले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, असे मत गावातील जुनी जाणती वयस्कर लोक व्यक्त करीत आहेत.

भुकूम ग्रामपंचायतीचे म्हणणे काय?
याबाबत भुकूम ग्रामपंचायतकडून सांगण्यात आले की पीएमआरडीए आणि ग्रामपंचायत एकत्र मिळून लवकरच यावर तोडगा काढणार आहोत. यामध्ये ड्रेनेज लाईन करून हे सगळे सांडपाणी छत्रपती शिवाजी महाराज जलाशयाच्या पलीकडे भूगाव ग्रामपंचायतीने केलेल्या ड्रेनेज पाईपलाईनला जोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Back to top button