पुणे : भैरोबानाल्यातील राडारोड्यामुळे पुराचा धोका | पुढारी

पुणे : भैरोबानाल्यातील राडारोड्यामुळे पुराचा धोका

वानवडी (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : भैरोबानाल्यातील राडारोडा, कचर्‍यामुळे या नाल्याचे डंपिंग ग्राउंड झाले आहे. लोकवस्तीमधून वाहणार्‍या या नाल्यात मोठ्या प्रमाणावर राडारोडा, प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, थर्माकोल, झाडाच्या फांद्या, मेलेली जनावरे तसेच कचरा हे सारे पाण्यातच कुजून जाते. याशिवाय कत्तलखान्यातून येणार्‍या रक्तमिश्रित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

येवलेवाडी येथे उगम असणारा भैरोबानाला पावसाळ्यामध्ये दुथडी भरुन वाहतो. उन्हाळ्यात ही या ओढ्यातून भरपूर पाणी वाहाते. पालिका प्रशासन व कँन्टोन्मेंट प्रशासनाने या ओढ्याची निगा राखली, तर या ओढ्यातील पाण्याचे उद्यानासाठी निश्चित नियोजन करता येईल. तीन वर्षांपूर्वी पडलेल्या परतीच्या पावसातील नाल्याला आलेल्या पुराने पाच नागरिकांचा जीव घेतला. वानवडी गावात विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ असणार्‍या नाल्यावरील पुलाची उंची कमी असल्याने अतिवृष्टीत पाणी पात्राबाहेर येऊन नागरी वस्तीमध्ये शिरते. यावर उपाययोजना म्हणून तरतूद यापूर्वी पावसाळपूर्वीच्या कामात केली गेलेली नाही.

पुलावर लावण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या तुटलेल्या आहेत. या तुटलेल्या जाळ्यांमुळे नागरीकांना इजा होण्याची शक्यता आहे. नागरिक कचरा नाल्यामध्ये टाकत असतात. त्यामुळे नाल्यातच कचर्‍याचे ढीग तयार झाले आहेत. कँन्टोमेंट व महानगरपालिका यांच्यामधील हद्दीच्या वादात भैरोबानाल्याच्या काही भागाकडे दुर्लक्ष होेते. सामंजस्याने नागरिकांच्या समस्या सोडवणे हे दोन्ही प्रशासनाचे काम आहे. त्यामुळे नालेसफाई करताना गाळ काढण्याबरोबर नाल्याच्या पात्रातील राडारोडा, कचरा, वाहत आलेले पाईप, मेलेली जनावरे काढण्यात यावीत अशी मागणी नागरीकांकडून होत आहे. वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाशी नाल्याच्या पावसाळापूर्व कामाची माहिती विचारली असता त्यांनी या नाल्याची कामे मुख्य खात्याकडून होतात अशी माहिती दिली.

कत्तलखान्यातील पाणी थेट नाल्यात

कॅन्टोन्मेंट हद्दीत असलेल्या कत्तलखान्यातील रक्त, मांस, हाडेमिश्रित दूषित पाणी थेट नाल्यात सोडण्यात आले आहे. त्यामुळे नॅन्सी गार्डन, गंगा सॅटेलाईट, नेताजीनगर, कुमार गुलमोहर या सोसायट्यांतील व नाल्याशेजारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत पालिकेकडून कॅन्टोन्मेंट प्रशासनाला कत्तलखान्यातील थेट नाल्यात उघड्यावर सोडण्यात आलेले रक्त, मांसमिश्रित पाणी बंद करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे तक्रार अर्ज करण्यात आला आहे. परंतु, कोणतीही कारवाई व उपाययोजना झाली नसल्याचे नागरिक सांगतात.

महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी नाले साफसफाईसाठी निधी मंजूर केला जातो. वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत भैरोबानाल्याचा भाग येत असल्याने त्याची साफसफाई करणे अनिवार्य आहे. ज्या भागात मशिन जाईल तेवढाच गाळ काढला जातो; परंतु पुलाची उंची वाढवणे, नाल्याच्या पात्रातील राडारोडा काढणे याबाबत पालिकेकडून उपाययोजना करणे आवश्यक आहे. लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रक्तमिश्रित पाण्याचा बंदोबस्त व्हायला हवा.
                                                                   – शिवाजी शिंदे, नागरिक

भैरोबानाल्याच्या पावसाळापूर्व कामाला सुरुवात झाली असून, जवळपास पन्नास टक्के काम होत आले आहे. नाल्यामध्ये जे रक्तमिश्रित पाणी वाहत आहे ते खडकी कॅन्टोन्मेंटमधील कत्तलखान्यातून येणारे आहे. त्या पाण्याचा बंदोबस्त करावा यासाठी महापालिकेमार्फत पत्र देण्यात आले असून, त्याचा पाठपुरावा सुरू आहे. पावसाळ्यात भैरोबानाल्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
                                      – राजेंद्र जाधव, कार्यकारी अभियंता, महापालिका

Back to top button