पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधम बापाला जन्मठेप | पुढारी

पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधम बापाला जन्मठेप

राजगुरुनगर (पुणे) : पुढारी वृत्तसेवा : पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या 45 वर्षीय नराधम बापाला राजगुरुनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. अंबाळकर यांनी मंगळवारी (दि. 9) जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
सन 2019 मध्ये हा गुन्हा घडला होता. नोव्हेंबर 2018 ते एप्रिल 2019 या कालावधीत स्वतःच्या 16 वर्षीय मुलीवर बापाने वारंवार बलात्कार केला. आई घरातून कामाला गेल्यानंतर तो मुलीवर बलात्कार करायचा. याबाबत आईला काही सांगितल्यास मुलीसह आईला मारून टाकण्याची धमकी तो द्यायचा. त्याच्या या कृत्यामुळे मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर हा घृणास्पद प्रकार पुढे आला.

पीडित मुलीसह तिच्या आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी बापाच्या विरोधात भादंवि 376, 504 व बाललैंगिक अत्याचार कायदा कलम 6 अन्वये गुन्हा दाखल केला होता. नात्याला काळिमा फासणार्‍या बापाला पोलिसांनी 3 मे 2019 रोजी बेड्या ठोकून त्याला येरवडा तुरुंगात धाडले होते. तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अनिल मोरे व सध्याचे तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास केला. तपासाअंती पीडित मुलीने बाळाला जन्म दिला होता. मात्र, ते मूल मयत झाले. त्याचा डीएनए, पीडित मुलीचा डीएनए व नराधम बापाचा डीएनए तपासण्यात आला. मयत अर्भकाचा बाप व पीडित मुलीचा बाप एकच असल्याचा भक्कम पुरावा पोलिसांना मिळाला होता.

हा खटला राजगुरुनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश ए. एम. अंबाळकर यांच्यापुढे सुरू होता. या खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता व्ही. एन. देशपांडे यांनी 11 साक्षीदार तपासले. नात्याला काळिमा फासणारा हा गुन्हा असून, साक्षी व पुरावे भक्कम आहेत. आरोपीला दया दाखविण्यासारखी ही घटना नसून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा मिळण्यासाठी युक्तिवाद केला. यात पीडित मुलगी, तिची आई, डॉक्टर, तपासी अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायाधीश ए. एम. अंबाळकर यांनी आरोपी बापाला जन्मठेप व 5 हजार रुपये दंड, भादंवि कलम 376 अन्वये 10 वर्षे सश्रम कारावास व 2 हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे. या खटल्याचे पोलिस कामकाज हवालदार एस. डी. सातपुते यांनी केले.

Back to top button