पाटस : 18 गुंठ्यांत घेतले 1 लाख 45 हजार रुपयांचे उत्पन्न; खरबूज पीक घेऊन निवडली वेगळी वाट | पुढारी

पाटस : 18 गुंठ्यांत घेतले 1 लाख 45 हजार रुपयांचे उत्पन्न; खरबूज पीक घेऊन निवडली वेगळी वाट

पाटस (ता. दौंड) ; पुढारी वृत्तसेवा : कुसेगाव येथील शेतकरी विनोद माणिकराव शितोळे यांनी 18 गुंठ्यांत खरबूज पीक घेतले. तब्बल 90 दिवसांत त्यांनी या पिकातून 1 लाख 45 हजार रुपयांचे उत्पन्न घेऊन एक वेगळी वाट निवडली आहे. उन्हाळ्यात खरबूज पिकाला चांगली मागणी असते. खरबूज पिकापासून 90 दिवसांत उत्पन्न मिळविण्यास सुरुवात होते. शेतीसाठी उन्हाळ्यात पाणी कमी पडत असल्याने उन्हाळी पीक घेण्याऐवजी विनोद शितोळे यांनी खरबूज पिकाची लागवड केली.

त्यांनी 18 गुंठ्यांत बेडपद्धतीला ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून त्यावर मल्चिंग पेपर टाकून 3 हजार खरबूज पिकाची लागवड केली होती. या अगोदर शेतीची मशागत करणे, शेणखत व कोंबड खते, औषध फवारणी या सर्व गोष्टींचा वापर करून 18 गुंठ्यांसाठी त्यांना 35 हजार रुपये खर्च आला. यातून त्यांना 1 लाख 45 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे, पीक घेण्यापासून तर विक्री करेपर्यंत सर्व व्यवस्था शितोळे यांनी स्वत: बजावली.

गावचे राजकारण पाहत असताना शेतीवर लक्ष देता येत नव्हते. त्यामुळे राजकारण सोडून शेतीवर लक्ष दिले. खरबूज पिकाचा कसलाही अनुभव नसताना हा नवीन मार्ग निवडला. आता यातून भरघोस उत्पादन घेत 1 लाख 45 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याने आनंद झाला. यासाठी स्वतः शेतीत कष्ट घेत फळ विक्री होईपर्यंत गावच्या राजकारणात भाग घेतला नाही.
                           विनोद शितोळे, खरबूज उत्पादक शेतकरी, कुसेगाव

Back to top button