खोर; पुढारी वृत्तसेवा : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत भाजपप्रणीत आमदार राहुल कुल गट व माजी आमदार रमेश थोरात गटाला चुरशीच्या निवडणुकीचा सामना करावा लागला. यामध्ये दोन्ही गटाने 9-9 जागा जिंकत बाजार समिती बरोबरीत सोडवली आहे. बाजार समितीचा सामना बरोबरीत सोडविला गेला असल्याने आता तर खरी मोठी चुरस खर्या अर्थाने सुरू झाली आहे. सभापती कोणत्या पक्षाचा होणार, याकडे दौंडकरांचे लक्ष वेधले गेले आहे.
दोन दिवसांपूर्वीच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दौंड येथे नवनिर्वाचित बाजार समितीच्या सदस्यांचा सत्कार केला. त्यांनी या सर्वांना राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची सूचना दिली आहे. अशा सूचना अजित पवार यांनी दिल्याने सभापतिपदासाठी फोडाफोडीचे गणित आखण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतेच चिन्ह दिसत नसल्याचे आता तरी चित्र स्पष्ट आहे.
दुसरीकडे आमदार राहुल कुल यांनी निवडणूक विजय मिरवणुकीच्या दिवशी आपण या बाजार समितीचा सभापती चिठ्ठी उचलून करण्याचे संकेत दिले आहे. ज्याप्रमाणे पंचायत समितीला चिठ्ठी उचलून सभापती केला गेला अगदी तशीच वेळ या निवडणुकीतदेखील येणार असल्याचे चित्र असणार आहे.
9-9 सदस्य संख्येचे गणित बरोबरीत सोडविले गेले असल्याने दोन्ही गट काठावर उत्तीर्ण झाले आहेत. दौंड तालुक्यातील दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असून, दोन्ही गट आमच्याच पक्षाचा सभापती होणार, असे छातीठोकपणे सांगताना मात्र दिसत आहेत. बाजार समितीच्या सभापतिपदाची तारीख अजून निश्चित झाली नसल्याचे दौंडचे सहायक निबंधक हर्षद तावरे यांनी सांगितले. जोपर्यंत सभापतिपदाची तारीख निश्चित होत नाही, तोपर्यंत दौंड तालुक्यातील सभापतिपदाच्या दावेदाराचे वारे दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये घर करून बसणार आहे, हे मात्र नक्की.