देहूगाव : पालखी मार्गावर स्वच्छतागृह उभारा; उपजिल्हाधिकारी संजय आसवले यांच्या अधिकार्‍यांना सूचना | पुढारी

देहूगाव : पालखी मार्गावर स्वच्छतागृह उभारा; उपजिल्हाधिकारी संजय आसवले यांच्या अधिकार्‍यांना सूचना

देहूगाव(पुणे): जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारीत वारकर्‍यांना पालखी मार्गावर स्वच्छतागृह व शौचालय उभारा आणि शुद्ध पाण्याचे टँकर पुरवा, अशा सूचना उपजिल्हाधिकारी संजय आसवले यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत.
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने नियोजन आढावा आणि पालखी महामार्गाची पाहणीसंदर्भात मुख्य मंदिराच्या कार्यालयामध्ये सोमवारी (दि. 8) दुपारी उपजिल्हाधिकारी संजय आसवले यांनी बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत विविध समस्या समजावून घेतल्या आणि संबंधित विभागाला आपत्कालीन व्यवस्था अंतर्गत त्वरित नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

या वेळी श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख संजयमहाराज मोरे, अप्पर तहसीलदार अर्चना निकम, स्थापत्य अभियंता संघपाल गायकवाड, बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य अड कैलास पानसरे, महावितरणाचे सहायक अभियंता विनोद वाघमारे, पाटबंधारे विभागाचे आलेख सहायक पी. जी. सोनवणे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, देहूरोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी आदी उपस्थित होते. दरवर्षी विद्युत पुरवठयासंदर्भात जास्त तक्रारी येत असतात. त्यामुळे कर्मचारी संख्या वाढिवणे, विद्युतपुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना महावितरण अधिकारी वाघमारे यांना देण्यात आल्या आहेत.

इंद्रायणी नदीत मैलामिश्रित सांडपाणी

वडीवळे धरणातून इंद्रायणीच्या नदीपात्रात पाणी सोडण्यात येते. तसेच, तळेगाव, कामशेत हद्दीतून मैलामिश्रित सांडपाणी तर अनेक कंपनीचे केमिकलयुक्त दूषित पाणी नदीपात्रात सोडण्यात येते. त्यामुळे इंद्रायनीच्या नदीपात्रातील पाणी दूषित होत असल्याची तक्रार पाटबंधारे विभागाने या बैठकीत केली.

विसावास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा

पहिले विसावा स्थळ म्हणजे (अनगडशहा बाबा दर्गा) आणि दुपारचा विसावा चिंचोली येथील (संत तुकाराम महाराज विसावा मंदिर) आदी ठिकाणी भाविकांचे पाकिटे, दागिने चोरी होत असल्याने परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी देहू देवस्थान संस्थानच्या वतीने या वेळी करण्यात आली.

उपजिल्हाधिकारी आसवले यांनी दिल्या सूचना

  • पालखी मार्गावर असणारी गतिरोधक त्वरित काढा
  • डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी संख्या वाढवा
  • औषधसाठा करा
  • रुग्णांसाठी बेड आरक्षित ठेवा
  • आरो फिल्टर प्लांटची व पिण्याचे पाणी तपासणी करा
  • आयएसआय नामांकित असणार्‍या कंपनीचेच मिनरल पाण्याच्या बाटल्या विक्री परवानगी द्या

Back to top button