

रमेश चौधरी
शेवगाव (नगर) : वाळू तस्कराकडून तलाठ्यास डंपरमधून पळविण्यात आले. तर महसूल पथकातील कर्मचार्यास डंपरच्या ट्रॉलीला लटकविण्याचा धक्कादायक प्रयत्न झाला. मात्र, राजकीय दबावामुळे हा प्रकार फक्त दंडात्मक कारवाईवर निपटल्याची घटना तालुक्यात आठ दिवसांपूर्वी घडली. याबाबत महसूल विभाग व पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. शेवगाव तालुक्यात वाळू तस्करांची वाढलेली मुजोरी शासकीय अधिकार्यांसह कर्मचार्यांना त्रासदायक ठरत आहे.
वाळू तस्करांवरील कारवाई अनेक पोलिस व महसूल कर्मचार्यांच्या जिवावर बेतल्याचे प्रसंग घडले आहेत. परिविक्षाधिन तहसीलदार राहुल गुरव व त्यांच्या सोबत असणार्या पथकाला बेदम मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच, आठ दिवसांपूर्वी देवटाकळी परिसरात ही घटना घडली आहे. शेवगाव महसूल पथकाने रात्रीच्या गस्तीत देवटाकळी परिसरात अनधिकृत वाळू वाहतूक करणारा डंपर पकडला.
हे वाहन कारवाईसाठी घेऊन येत असताना काही अंतरावर मागून आलेली स्कार्पिओ, स्विप्ट कार डंपरला आडवी लावण्यात आली. यावेळी कारवाई करू नका, आमची पहिलीच वेळ आहे, अशी चर्चा सुरू असताना डंपरचा मालक तेथे हजर झाला. त्याने चालकास खाली उतरवून स्टेअरिंग आपल्या हातात घेतले आणि तहसील कार्यालयात वाहन घेतो, असे म्हणत आत बसलेल्या तलाठ्यासह डंपर सुसाट पळविला. पुढे महावितरण कार्यालयासमोर अर्धी वाळू खाली केली व वाहनात असलेल्या तलाठ्यास खाली उतरवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते उतरत नसल्याचे पाहून तलाठ्यास घेऊन हे वाहन पसार झाले.
डंपरचा पाठलाग करीत असलेल्या पथकाने तिसगाव पोलिसांना याची माहिती दिली, तसेच 112 दूरध्वनीवरून पोलिसांची मदत घेतली. मात्र, सदर वाहन कासार पिंपळगावमार्गे हनुमान टाकळीकडे गेले. तेथेही तलाठ्यास उतरवून देण्याचा प्रयत्न सुरू असताना पाठलाग करणारे पथक दाखल झाले. घाईघाईने एक कर्मचारी वाहनावर चढताच मालकाने डंपरची ट्रॉली वर करून त्या कर्मचार्यास खाली पाडण्याचा प्रयत्न केला. या सार्या झटापटीतून पथकाने तलाठ्यास डंपरमधून कसेबसे खाली घेतले.
त्यानंतरही तेथून वाळूचा डंपर पसार झाला. परंतु, पथकाने पाठलाग सोडला नाही. शेवटी सोमठाणे बुद्रुक येथे हे वाहन ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. झालेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता डंपर चालक, मालकावर गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत असलेल्या अधिकार्यांवर राजकीय दबाव आल्याने, फक्त दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, हे कर्मचारी कोण याची माहिती देण्यास कोणी धजावत नसल्याचे दिसून आले.
डंपरवर चढलेल्या पथकातील कर्मचार्याला ट्रॉली वर करून खाली पाडण्याचा प्रयत्न डंपर चालविणार्या मालकाने केला. यात उचललेल्या डंपरच्या ट्रॉलीचा धक्का लागल्याने तेथील विद्युत रोहित्रासह विजेचे खांब खाली कोसळले. नशीब बलवत्तर म्हणून यावेळी काही अनुचित घटना घडली नाही. मात्र, याबाबत महावितरणकडूनही कोणताच गुन्हा दाखल झाला नाही.