राज्यातील खरीप पीक स्पर्धेचा निकाल जाहीर : कृषी आयुक्त चव्हाण यांची माहिती | पुढारी

राज्यातील खरीप पीक स्पर्धेचा निकाल जाहीर : कृषी आयुक्त चव्हाण यांची माहिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील 2022 मध्ये खरीप हंगामात भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफुल या 11 पिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पीकस्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आल्याची माहिती कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली. विविध गटांतील प्रथम विजेते या राज्यस्तरीय खरीप पीकस्पर्धेत भात सर्वसाधारण गटामध्ये चांदखेड, जि. पुणे येथील शेतकरी नितीन चंद्रकांत गायकवाड यांनी राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या सहापट अधिक उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक मिळविला.

मराठवाड्यातील महिला शेतकरी जयश्री डोणगापुरे यांनी तूर पिकात राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या चारपट अधिक उत्पादन मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर बोरपाडळे (कोल्हापूर) येथील बाजीराव खामकर यांनी सोयाबीन सर्वसाधारण गटात राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या सहा पट अधिक उत्पादन मिळवून प्रथम क्रमांक मिळवला.

बाजरी पिकात सांगली जिल्ह्यातील विठ्ठल ईश्वर सावंत यांनी, तर नाचणी पिकात कोल्हापूर जिल्ह्यातील शिवलिंग कल्लाप्पा गावडे, मूग पिकासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सुभाष बाजीराव कर्डिले, उडीद पिकासाठी दीपक तुकाराम ढगे तसेच भुईमूग पिकासाठी कृष्णा भाऊ चौगुले व सूर्यफुल पिकाच्या उत्पादन वाढीसाठी सोलापूर जिल्ह्यातील सोपान कृष्णा कारंडे हे प्रथम क्रमांक विजेते ठरले आहेत.

हरपळवाडी (सातारा) येथील शेतकरी प्रल्हाद नारायण काळभोर यांनी ज्वारी पिकात तर अग्रण धुळगावचे (सांगली) संभाजी तातोबा खंडागळे यांनी मका पिकात राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या सातपट अधिक उत्पादन मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. नांदेडच्या वनिता श्रीराम फोले यांनी सोयाबीन आदिवासी गटात विक्रमी उत्पादन मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. दरम्यान, पीकस्पर्धेत सहभाग घेण्यासाठी सर्वसाधारण व आदिवासी गटास पीकनिहाय प्रत्येकी रक्कम 300 प्रवेश शुल्क आहे. अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहनही कृषी आयुक्तांनी केले आहे.

Back to top button