पुणे : ब्लेडने वार, डोक्यात मारहाण करून खून

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जुन्या मोबाईलचे दीड हजार रुपये न दिल्याच्या कारणातून तरुणाने एकाच्या गळ्यावर ब्लेडने वार केले. त्यानंतर डोक्यात मारून खून केला. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी राम श्रीमंत वाघमारे (वय 20, रा. वारजे पुलाजवळ, फुटपाथवर, वारजे) याला अटक केली आहे. तर अमरजित जगन्नाथ गोयल (वय 50, रा. वारजे पुलाजवळ, मुळ रा. उत्तर प्रदेश) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस नाईक राहुल कदम यांनी वारजे माळवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
ही घटना वारजे पुलाजवळील पृथक बराटे गार्डनसमोर शनिवारी रात्री 11 वाजता घडली. वारजे पुलाजवळील बराटे गार्डनसमोर फुटपाथवर एक जण जखमी अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी त्याला रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शवविच्छेदनाच्या अहवालात गळ्यावर ब्लेडने वार केल्याचे तसेच डोक्यात मारहाण केल्याने झालेल्या जखमांमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. पोलिसांनी याबाबत चौकशी केल्यावर नीलेश खोजे व गणेश टाळकुटे यांच्याकडून माहिती मिळाली.
अमरजित गोयल व राम वाघमारे हे दोघेही फुटपाथवर राहत होते. गोयल याला वाघमारे याने जुना मोबाईल दिला होता. मात्र, त्याचे दीड हजार रुपये गोयल देत नव्हता. त्यात वाघमारे याने त्याला मारहाण करून ब्लेडने वार केले. सहायक पोलिस निरीक्षक रमेश बाबर तपास करीत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूला चौकशी करून माहिती घेतली. यावेळी खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटली. तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. हाके, गुन्हे निरीक्षक दत्ताराम बागवे, सहायक पोलिस निरीक्षक रमेश बाबर, उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, अंमलदार रामदास गोणते, अमोल राऊत, अतुल भिंगारदिवे यांच्या पथकाने केली.