पारगाव : ऐनलग्नसराईत झेंडूच्या बागा कोमेजलेल्याच; फुलांना बाजारभाव नाही | पुढारी

पारगाव : ऐनलग्नसराईत झेंडूच्या बागा कोमेजलेल्याच; फुलांना बाजारभाव नाही

पारगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : नुकत्याच संपलेल्या यात्रा-जत्रा हंगामात झेंडूच्या फुलांना बाजारभावाची साथ मिळालीच नाही. आता लग्नसराईचा हंगाम सुरू असून बाजारभावात वाढ होत नसल्याने झेंडू उत्पादकांनी पीक सोडून दिले आहे. परिणामी ऐनलग्नसराईतही आंबेगावच्या पूर्वेला झेंडूच्या बागा कोमेजलेल्याच आहेत. आंबेगाव पूर्वभागात यात्रा व लग्नसराईचा हंगाम डोळ्यांसमोर ठेवून अनेक शेतकरी झेंडूचे पीक घेतात, परंतु गेले दोन-तीन वर्षे झेंडूला बाजारभावाची साथ मिळालीच नाही.

उन्हाळी हंगामात झेंडूच्या फुलांना वजन कमी असते. त्यातून गळीतही कमी असते. त्यात यंदा फुलांना बाजारभाव मिळालाच नाही. त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. उन्हाळी हंगामात झेंडूसाठी शेतकर्‍यांनी महागडी रोपे, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचनचा वापर केला, परंतु किलोला तीस रुपयांपर्यंतच बाजारभाव मिळाला. भांडवलाच्या तुलनेत हा बाजारभाव परवडला नाही.

सध्या किलोला केवळ 30 रुपये बाजारभाव मिळत आहे. अत्यंत कमी बाजारभावामुळे भांडवलही वसूल होत नाही. सलग तिसर्‍या वर्षी फुलांना बाजारभाव मिळालेला नाही, परिणामी झेंडूचे पीक तोट्याचे बनले आहे.

                         संतोष वाबळे, झेंडू उत्पादक शेतकरी, थोरांदळे

Back to top button