अवकाळी सोडेना पुणे जिल्ह्यातील शेतकर्‍यांची पाठ | पुढारी

अवकाळी सोडेना पुणे जिल्ह्यातील शेतकर्‍यांची पाठ

नानगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मागील दोन महिन्यांपासून सर्वत्र अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे शेतकरर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. आज पाऊस थांबेल, उद्या वातावरण बदलेल, या आशेने शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. मात्र, दररोज आकाशात ढगाळ हवामान तयार होत आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस आणि वातावरण बळीराजाची पाठ सोडायला तयार नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

जिल्ह्यात व वेगवेगळ्या तालुक्यांत अवकाळी पाऊस पडत आहे. सकाळी हवामानात उष्णता आणि सायंकाळी ढगाळ हवामान तयार होऊन पडणारा अवकाळी पाऊस शेतकर्‍यांची डोकेदुखी ठरत आहे. मागील काही दिवसांपासून दिवसभर कडकडीत ऊन आणि सायंकाळी ढगाळ हवामान व वादळी वार्‍यासह ठिकठिकाणी पडणारा पाऊस, असे चित्र होते.

मात्र, मागील दोन ते तीन दिवसांपासून सकाळीच आकाशात ढगाळ वातावरण तयार होत असून, कुठे ना कुठे पावसाचा शिडकावा होत आहे. सकाळी होणार्‍या या ढगाळ वातावरणामुळे शेतीपिकांवर मोठ्या प्रमाणावर कीडरोगांचा प्रादुर्भाव होत आहे. एकीकडे अवकाळी पावसाची चिंता व दुसरीकडे कीडरोगाचा प्रादुर्भाव, यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

पुढील महिना पावसाचाच!

या ढगाळ वातावरणामुळे पालेभाज्या व फळभाज्या पिकांवर मोठ्या प्रमाणावर कीड पडत आहे. त्यामुळे शेतकरी पैसे खर्च करून महागडी औषध फवारणी करीत आहे. मे महिन्यानंतर जून सुरू होताच पावसाचे दिवस सुरू होतील. त्यामुळे या संकटातून सुटले तरी पुढील पावसाच्या कचाट्यात शेतकरी पुन्हा सापडणार आहे.

पावसाच्या भीतीने कामे उरकण्यावर भर

सध्याचे अवकाळी पावसाचे व वादळी वार्‍याचे वातावरण आणि पुढील पावसाचे दिवस, यामध्ये बळीराजा चांगलाच अडकून पडणार असल्याची वस्तुस्थिती आहे. सध्या बर्‍याच ठिकाणी गहू कापणी झाली, तर काही ठिकाणी सुरू आहे. काही ठिकाणी कांदा काढणीची कामे जोरात सुरू आहे. पावसाच्या भीतीमुळे बळीराजा दिवसरात्र शेतात काम करताना दिसत आहे.

Back to top button