राज्यात 21 हजारांवर बोगस सिम कार्ड | पुढारी

राज्यात 21 हजारांवर बोगस सिम कार्ड

पिंपरी, किरण जोशी : एकाच व्यक्तीच्या फोटोच्या आधारे शेकडो बोगस सिम कार्ड घेतल्याची धक्कादायक माहिती टेलिकॉम विभागाच्या पाहणीत पुढे आली. राज्यातील अशी 21 हजारांवर बोगस सिम कार्ड बंद करण्यात आली आहेत.

दिल्लीत बनावट सिम कार्डद्वारे आर्थिक फसवणुकीचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर टेलिकॉम विभागाने महाराष्ट्रातील बनावट सिम कार्ड शोधून काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. मोबाईल कंपन्यांकडून ‘कॅफ’ (कस्टमर अ‍ॅप्लिकेशन फॉर्म) मागविण्यात आले. सिडॅकच्या सुपर कॉम्प्युटरच्या माध्यमातून आर्टिफिशिअल इंटेलिजन्स टूल वापरून प्राथमिक टप्प्यात 6 लाखांवर ‘कॅफ’ तपासण्यात आले. यामध्ये राज्यातील 21 हजार बोगस सिम कार्ड असल्याची माहिती पुढे आली. ही सिम कार्ड ताबडतोब बंद करण्यात आली असून, संबंधित जिल्ह्यातील पोलिसांशी संपर्क साधून कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.

फोटो एक, कार्ड अनेक

इंडियन टेलिग्राम अ‍ॅक्टअंतर्गत नियमानुसार एका व्यक्तीला 9 सिम कार्ड वापरण्याची परवानगी आहे. पुण्यात एकाच व्यक्तीचे छायाचित्र इतरांच्या आधार कार्डवर चिकटवून सुमारे 600 बोगस सिम काडर्र् घेतल्याचे दिसून आले आहे. याच प्रकारे एकाच व्यक्तीच्या छायाचित्रावर 100 ते 300 सिम कार्ड आढळून आली आहेत. पहिल्या टप्प्यातील तपासणीत राज्यात 21 हजार 31 सिम कार्ड बोगस असल्याचे उघड झाले आहे. अशा बोगस पद्धतीने घेतलेल्या सिम कार्डचा वापर गुन्हेगारांकडून होत आहे.

इथे सापडली बनावट सिम कार्ड

पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, ठाणे, अहमदनगर, नाशिक, अमरावती, यवतमाळ, बीड.

Back to top button