पुणे: आरटीई प्रवेशांसाठी 15 मेपर्यंत मुदतवाढ, आतापर्यंत 49 हजार 385 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित | पुढारी

पुणे: आरटीई प्रवेशांसाठी 15 मेपर्यंत मुदतवाढ, आतापर्यंत 49 हजार 385 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी 8 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु, दिलेल्या मुदतीतही अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी आता 15 मेपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे. आत्तापर्यंत 49 हजार 385 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाल्याचे आरटीई संकेतस्थळावरील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा 8 हजार 823 शाळांतील 1 लाख 1 हजार 846 जागा प्रवेशांसाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी 3 लाख 64 हजार 413 विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले होते. प्रवेशासाठीच्या सोडतीमध्ये 94 हजार 700 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. प्रवेशासाठी 13 एप्रिलपासून 25 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र पोर्टलमधील तांत्रिक अडचणींमुळे सुरूवातीला 8 मेपर्यंत तर आता 15 मेपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच शिक्षणाधिकारी आणि प्रशासन अधिकारी स्तरावर प्रलंबित असलेल्या तक्रारी व अपील अर्जांबाबत सुनावणी घेऊन 15 मेपर्यंत निकाली काढणे गरजेचे आहे. त्यानंतर सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी सोडतीत निवडण्यात आलेल्या प्रतिक्षा यादीतील बालकांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.

आरटीई प्रवेशाची सद्यस्थिती

प्रवेशासाठी नोंदणीकृत शाळा – 8823
आरटीई प्रवेशासाठी रिक्त जागा – 101846
प्रवेशासाठी आलेले अर्ज – 364413
सोडतीव्दारे प्रवेश जाहीर – 94700
आत्तापर्यंत झालेले प्रवेश – 49385

Back to top button