पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपायुक्त, सहायक आयुक्त अशा एकूण 18 अधिकार्यांच्या आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी 13 एप्रिलला अचानक बदल्या केल्या. आता, या आठवड्यात उर्वरित अधिकार्यांच्या बदल्या करण्यात येणार आहे. या बदल्याची उत्सुकता महापालिका वर्तुळात लागली आहे.
अकार्यक्षम अधिकार्यांना कमी दर्जाचे विभाग
कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता तत्कालिन आयुक्त राजेश पाटील यांनी उपायुक्त, सहायक आयुक्तांसह बहुतांश कर्मचार्यांच्या बदल्या केल्या होता. त्यानंतर आयुक्त सिंह यांनी 13 एप्रिलला 18 वरिष्ठ अधिकार्यांच्या बदल्या केल्या. अधिकार्यांची कामगिरी लक्षात घेऊन आयुक्तांनी त्या बदल्या केल्या. अकार्यक्षम अधिकार्यांना कमी दर्जाचे विभाग देण्यात आले आहेत. तर, कार्यक्षम अधिकार्यांकडे पूर्वीचे विभाग कायम ठेवण्यात आले. तर, काही अधिकार्यांकडे अधिक विभागांची जबाबदारी देऊन महत्व वाढविण्यात आले आहे. कमी दर्जाचे विभाग मिळाल्याने काही अधिकारी नाराज आहेत.
कर्मचार्यांना अर्ज पाठविण्याचे आवाहन
पालिकेच्या उर्वरित अधिकार्यांच्या बदल्या या आठवड्यात करण्यात येणार आहेत. सामान्य प्रशासन विभागाने तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच विभाग ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचार्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. बदलीस पात्र असलेल्या कर्मचार्यांकडून नवीन कोणता विभाग असावा यासाठी अर्जही घेण्यात आले आहेत. त्यानुसार आता अधिकारी व कर्मचार्यांची बदली केली जाणार आहे. अधिकारी व कर्मचार्यांची कोणत्या विभागात बदली होते याची उत्सुकता
लागली आहे.
नियमानुसार होणार बदल्या
शासनाच्या नियमानुसार महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्यांच्या इतर विभागात बदल्या करण्यात येत आहेत. त्याबाबत कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी कर्मचार्यांकडून नवीन विभाग कोणता हवा, याबाबत अर्जही घेण्यात आले आहेत. आयुक्त लवकरच बदल्याबाबत योग्य तो निर्णय घेतील, असे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.