पिंपरी : 12 दिवसांत 2 लाख मिळकतकर बिलांचे वाटप | पुढारी

पिंपरी : 12 दिवसांत 2 लाख मिळकतकर बिलांचे वाटप

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाची तब्बल दोन लाख मिळकतकर बिले केवळ 12 दिवसांत वाटण्यात आली आहेत. महिला बचत गटांच्या एकूण 390 महिलांद्वारे बिलांचे घरोघरी जाऊन वाटप करण्यात येत आहे. येत्या 31 मे पर्यंत उर्वरित 4 लाख बिलांचे वाटप करण्याचे नियोजन आहे. पालिकेकडे शहरातील 5 लाख 97 हजार 785 निवासी व बिगरनिवासी मिळकतीची नोंद आहे. कर संकलन विभागाने महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बचत गटाच्या 390 महिलांना मिळकतकराची बिले वाटपाचे काम दिले आहे. अवघ्या 12 दिवसात 2 लाखांपेक्षा जास्त मिळकतकर बिलांचे वाटप झाले आहे. तसेच, माहितीचे संकलन केले आहे. प्रत्येक बिलामागे 15 रूपये शुल्क पालिका देत आहे.

मोबाईल अ‍ॅप्लिकेशनद्वारे मिळकतीचे अक्षांश व रेखांशची माहिती घेतली जात असून, प्रत्येक मिळकतीचे छायाचित्र घेऊन जिओ टॅग केले आहे. त्यामुळे मिळकत शोधण्यात भविष्यात अडचण येणार नाही. अ‍ॅपद्वारे मिळकतधारकांचा चुकीचा मोबाईल क्रमांक दुरूस्त केले जात असून, नवीन मोबाईल क्रमांक अपडेट केला जात आहे. आतापर्यंत 50 हजारांपेक्षा अधिक मोबाईल क्रमांक दुरूस्त केले असून, दहा हजार मिळकतींचे पर्यायी मोबाईल क्रमांक नोंदविण्यात आले आहेत. तसेच, 70 हजार पत्त्यांमध्ये दुरूस्ती करण्यात आली आहे. राहत नसलेल्या मिळकतधारकांचा पर्यायी पत्ताही घेतला जात आहे. दहा हजार मिळकतधारकांचे पर्यायी पत्ते अद्ययावत करण्यात आले आहेत. आतापर्यंत 3 हजारावर मिळकती आढळून आल्या नाहीत.

महिला स्थानिक असल्याने मिळकती शोधणे सुलभ
महिला सक्षमीकरण व कर संकलन विभागाच्या माहितीचे शुद्धीकरण अशी दोन महत्त्वाची उद्दिष्टे ठेवून सिद्धी प्रकल्प हाती घेण्यात आला होता. स्थानिक महिलांना बिले वाटपाचे काम दिले आहे. यातून त्यांना शहराच्या स्थानिक भागाची सखोल माहिती होत आहे. याचा भविष्यात विविध योजनांसाठी कसा उपयोग करून घेता येईल यावर आमचे काम चालू आहे, असे पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.

Back to top button