नानगाव भागात चोरांचा हैदोस थांबणार कधी ? | पुढारी

नानगाव भागात चोरांचा हैदोस थांबणार कधी ?

राजेंद्र खोमणे

नानगाव(पुणे) : दौंड तालुक्यातील भीमा नदीपट्ट्यातील नानगाव, पारगाव व कानगाव भागात गेली काही दिवसांपासून चोरट्यांनी चांगलाच हैदोस घातला आहे. परिसरात व वाडी-वस्त्यांवर भीतीचे वातावरण आहे. चोरांची टोळी पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. महिन्यापासून या भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. नानगाव येथे यात्रोत्सव काळात येथील दुरेकरवस्ती व गुंडवस्ती भागात चोरट्यांच्या टोळक्याने एका रात्रीत दोन- तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला होता. एका घरातून सोन्याची चेन लंपास केली होती. बाकी घरांची झाडाझडती घेत चोरीचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांच्या हाताला काहीच लागले नाही.

नंतर दोन-तीन दिवसांतच गणेशरोड परिसरात चोरट्यांनी यात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एका रात्रीत सहा ते सात घरांमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला. एका वृद्ध व्यक्तीला मारहाण केली तर काही ठिकाणी घरात जाऊन कपाटाची उचकापाचक केली. एका ठिकाणी बाहेर झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचा दागिना तोडून नेत चोरटे पसार झाले. गावात चोरट्यांचा धुमाकूळ पहाता युवक व नागरिकांनी गस्त घालण्यास सुरुवात केली.

या काळात चोरट्यांनी जराशी विश्रांती घेतली, मात्र याच काळात कानगाव येथील यात्रोत्सवातही पहिल्या रात्री दोन- तीन ठिकाणी चोरी केली. एका ठिकाणी तीन लाख रुपये रोकड व बारा तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. दुसर्‍या ठिकाणी महिलेच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज तोडून चोरटे पसार झाले.

मागील तीन चार दिवसांपुर्वी पारगाव सा.मा. येथे रात्रीच्या वेळी एका बँकेचे एटीएम मशीन जिलेटीनच्या सहाय्याने तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क नागरिकांमुळे चोरांचा प्रयत्न फसला. चोरट्यांनी जिलेटीनच्या सहाय्याने एटीएम मशीन तोडले असते तर एटीएमच्या जवळपासच्या दुकानांचेही नुकसान झाले असते.

नानगाव येथे पुन्हा एकदा चोरट्यांनी एका घरात शिरण्याचा प्रयत्न केला, मात्र घराच्या वरील बाजुच्या दरवाज्याला सेफ्टी दरवाजा असल्याने चोरांचा घरात शिरण्याचा प्रयत्न फसला.मात्र यावेळी घराच्या खिडकीतून उतरणार्‍या एका चोराला जखम झाल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. अशा प्रकारे या भागात सध्या चोरांची चांगलीच भीती निर्माण झाली आहे. घटना घडल्यावर पोलिस त्या ठिकाणी जाऊन माहिती घेत आहेत. मात्र सध्या पोलिस तपासाकडे या भागातील नागरिकांचे लक्ष लागले असून या चोरट्यांची टोळी पकडण्याची मागणी नागरिक करत आहेत.

ग्रामसुरक्षा दलात नवीन तरुणांची गरज

अनेक वर्षांपासून गावागावात ग्राम सुरक्षा दल स्थापन केली आहेत.मात्र या जून्या ग्राम सुरक्षा दलात मरगळ आली आहे. त्यामुळे नवीन तरुणांची ग्राम सुरक्षा दलात निवड करून त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन कर्तव्य व जबाबदार्‍या सांगणे काळाची गरज आहे.

नागरिकांना ग्रामसुरक्षा यंत्रणांची माहिती द्यावी

गावातील व परिसरातील नागरिकांना वेळोवेळी ग्राम सुरक्षा यंत्रणांची माहिती देणे गरजेचे आहे, जेणेकरून एखादी घटना घडत असताना एकाच वेळी गावातील अनेक फोनवर माहिती मिळू शकते

Back to top button