पाटसमधील तलावाच्या परिसरात कचर्‍याचे ढीग | पुढारी

पाटसमधील तलावाच्या परिसरात कचर्‍याचे ढीग

पाटस(ता. दौंड) पुढारी वृत्तसेवा : पाटस गाव गेल्या काही दिवसांपासून कचर्‍याच्या विळख्यात सापडले आहे. गावातील हॉटेलचालक, दुकानदारांसह नागरिकांकडून येथील तलावालगत कचरा टाकण्यात येतो. त्यामुळे डास, माशांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. परिणामी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा टाकणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. पाटस गावात अनेक ठिकाणी मोकळ्या जागांवर कचरा साचला आहे.

कचर्‍यामुळे परिसर गलिच्छ झाला आहे. गाव तलावालगत हॉटेलचालक उरलेले अन्न, ओला कचरा टाकत आहेत. दुकानदारदेखील त्यांच्याकडील कचरा तेथे टाकत असल्याने कचर्‍याचे ढीग तयार झाले आहेत. मांस विक्री करणारे दुकानदारदेखील त्यांचा कचरा तलावालगत टाकत असल्याने परिसरात दुर्गंधी सुटली आहे.

कचर्‍यामुळे परिसरात मोकाट कुत्री, जनावरांचा वावर वाढला आहे. त्याचाही त्रास विद्यार्थी, प्रवासी आणि स्थानिकांना होत आहे. कचरा समस्येबाबत ग्रामपंचायत पुढाकार घेत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. ‘कचरा टाकल्यास कारवाई केली जाईल,’ असा फलक लावलेला असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून तेथे कचरा टाकला जात आहे. संबंधितांवर कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

Back to top button