

पाटस(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पडवी- कुसेगाव परिसरात शनिवारी (दि.6) सायंकाळी अचानक आलेल्या मुसळधार पावसाने शेतकर्यांच्या पिकाचे नुकसान केले. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे जमीन तापली जात आहे. कांदा पिकाची काढणीही वेगाने सुरू आहे. मात्र, काही शेतक-यांना कांदा काढण्यासाठी मजूर मिळत नसल्याने काढणीला आलेले कांदा शेतजमिनीत तसाच राहिला होता.
मात्र, शनिवारी आलेल्या पावसाने जमिनीतील तापमानामुळे कांदा पिकाला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काहींच्या पालेभाज्यांचेही पावसाचा फटका बसून नुकसान झाले आहे. यंदा दौंड तालुक्यात कांदा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. कांदा काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने पावसात भिजून हातातोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान होऊ नये, यासाठी कांदा काढणीचा वेगही जास्त आहे. निघालेला कांदा वखारीत टाकण्याची तयारी शेतकरी करत असतानाच पाऊस येऊन नुकसान होत आहे. परिणामी कांदा काढणीचा खर्च जाऊनही पिकांचे नुकसान होणार असल्याने बळीराजासमोर आर्थिक संकट येणार आहे.