पाटस : डोंगरचारा संपल्याने चिंकारांचे हाल; चार्‍यासाठी मेंढपाळांचीही भटकंती | पुढारी

पाटस : डोंगरचारा संपल्याने चिंकारांचे हाल; चार्‍यासाठी मेंढपाळांचीही भटकंती

पाटस(दौंड); पुढारी वृत्तसेवा : कडाक्याच्या उन्हामुळे हिरवा डोंगरचारा संपुष्टात आल्याने जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी मेंढपाळांचे हाल होत असून, त्यांना वणवण भटकंती करावी लागत आहे. वनक्षेत्रातील चिंकारा जातीची हरणे चारा संपल्याने शेतकर्‍यांची पिके खात असून, नुकसान करीत असल्याने वन विभागालगतचे शेतकरीही त्रस्त झाले आहेत.

दौंड तालुक्याला रोटी, हिंगणीगाडा, कुसेगाव, पडवी, देऊळगावगाडा, खोर या भागांत मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. चिंकारा जातीच्या हरणांची संख्या या वनत्रेक्षात जास्त आहे. उन्हाळ्यात डोंगरचारा वाळून व वणवा लागून जळून गेल्याने चिंकारा हरणांनी अन्न-पाण्यासाठी शेतकर्‍यांच्या शेतात धाव घेतली आहे. पाटस परिसरात ऊसतोडही थांबल्याने हिरव्या चार्‍याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने मेंढपाळ कडाक्याच्या उन्हात हिरव्या चार्‍याचा शोध घेत असून, हिरवा चारा विकत घेऊन जनावरांना चारत आहेत.

Back to top button