भोर तालुक्यात सोयाबीनकडे शेतकर्‍यांचा कल | पुढारी

भोर तालुक्यात सोयाबीनकडे शेतकर्‍यांचा कल

भोर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : भोर तालुक्यात बागायती पिकांच्या तरकारीला हमीभाव मिळत नसल्याने सोयाबीन पिकाच्या उत्पन्नाकडे शेतकर्‍यांचा कल वाढला आहे. भोर तालुक्यात तरकारी पिकांच्या उत्पन्नासाठी मुबलक पाणी तसेच शेतजमीनही मोठ्या प्रमाणावर असली तरी तरकारी पिकांना चांगला भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांचा मोठा तोटा होत आहे. सोयाबीनचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर तसेच हमीभाव मिळत असल्याने तालुक्यातील शेतकर्‍यांनी उन्हाळ्यात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली आहे.

सध्या सोयाबीन पीक जोमात आले आहे. भोर तालुका दुर्गम-डोंगरी असल्याने पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणावर होते, मात्र डोंगररांगा खडकाळ व उथळ असल्याने पाणी सखोल भागाकडे वाहून जात होते. सध्या ठिकठिकाणी कोल्हापुरी पद्धतीचे छोटे बंधारे तसेच तालुक्याच्या पश्चिमेकडील हिर्डोस मावळ खोर्‍यात निरा-देवघर धरण झाल्याने पावसाचे पाणी आडले जात आहे. परिणामी पाण्यामुळे तालुक्याच्या सखोल भागाकडील विहिरी, ओढ्या- नाल्यांना पाणी वाढले आहे.

तालुक्यात यामुळे बागायती शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले आहे. पाणी मुबलक असल्याने शेतकरी बागायती शेतीत तरकारी पिके करू लागले होते. मात्र, शेतात केलेल्या तरकारी पिकांना हमीभाव मिळत असल्याने तरकारीपेक्षा सोयाबीन उत्कृष्ट असे म्हणत शेतकर्‍यांनी हजारो हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी केली असून सोयाबीन पिकाच्या उत्पन्नाकडे तालुक्यातील शेतकर्‍यांचा कल वाढला आहे. सोयाबीन पिकाला पाणी जास्त किंवा कमी झाले तरी सोयाबीनचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर होते तर कमी कष्टात जास्त उत्पन्न मिळणारे सोयाबीन हे पीक असल्याचे बाजारवाडीचे शेतकरी आनंदा खोपडे यांनी सांगितले.

Back to top button