शंभरावर सराईतांची झाडाझडती; खुनाच्या घटनेनंतर मुंढवा पोलिस ‘अॅक्शन मोड’वर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : घर आणि गोठ्याजवळ नशा करत बसलेल्या टोळक्याला व्यावसायिकाने हटकले. त्यामुळे टोळक्याने कोयत्याने वार करून व्यावसायिकाचा खून केला. या घटनेनंतर मुंढवा पोलिस चांगलेच ‘अॅक्शन मोड’वर आले आहेत. घटनेनंतर परिसरातील तब्बल शंभरहून अधिक सराईतांची झाडाझडती घेतली. मुंढवा पोलिस ठाण्याच्या जेवढे आरोपी आहेत त्या सराईत गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात आणून त्यांच्याकडून सामाजिक शांतता भंग होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
त्याबरोबरच रायझिंग स्टार गुन्हेगारांना दिवसातून दोन वेळा तपासले जात आहे. अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे यांच्यासह त्यांच्या पोलिस ठाण्याची पथके केशवनगर आणि मुंढवा भागात सकाळ, दुपार, संध्याकाळ पेट्रोलिंगद्वारे, नाकाबंदी करून ट्रीपलसिट प्रवास करणारे, तसेच संशयास्पद वाटणार्यांची चौकशी करीत आहेत. तसेच रात्रीच्या वेळी हद्दीतील ब्लॅकस्पॉटचीदेखील पेट्रोलिंग करून तपासणी केली जात आहे.
खुनाच्या घटनेत 7 आरोपींना अटक करण्यात आली असून, आतापर्यंत 102 सराईत गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली आहे. तर, 30 ट्रीपलसीट नागरिकांवरदेखील कारवाई करण्यात आली. ठाणे हद्दीतील सराईतांची यादी करण्यात आली असून, त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
– अजित लकडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंढवा पोलिस ठाणे.